विशाल पुजारी, प्रतिनिधी
Sambhaji Bhide on Shivarajyabhishek : रायगड किल्ल्यावर तारखेनुसार म्हणजेच 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजी भिडे काय म्हणाले?
'6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा राजकारणासाठी वापरला जात आहे,' असं मत संभाजी भिडे यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत. 6 जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष केला पाहिजे. 76 वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. 6 जून रोजी साजरा होणारा कार्यक्रम बंद केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
( नक्की वाचा : Operation Sindoor : केंद्रीय मंत्र्यांनी केला उद्धव ठाकरेंना फोन ! दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा? )
जयंत पाटलांकडून निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मृतींवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे,' असे पाटील म्हणाले. 'लहानपणापासून आपण ज्या इतिहासाला मानतो, तो मोडण्याचे आणि नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. अशा लोकांची दृष्टी तपासण्याची गरज आहे,' असा टोलाही पाटील यांनी लगावला.
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी या वादावर सरकार लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले. शिवराज्याभिषेक हा 6 जून रोजी साजरा होतो, यावर कोणताही वाद नको. तारखेवर बंधन घालणे योग्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही दोन मतप्रवाह असल्याचे त्यांनी मान्य केले. "यावर एक समिती नेमली जाईल आणि मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील," असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारची भूमिका काय?
संभाजी भिडे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. यापूर्वीही पूर्वीही अनेकांनी असं मत व्यक्त केलंय. मात्र राज्य सरकारची भूमिका याबाबत स्पष्ट असून राज्य सरकारनं आधीच निर्णय घेतलाय असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं.