शरद सातपुते
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत एका खाजगी रुग्णालयात घसून तोडफोड केली आहे. यात रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या. शिवाय रुग्णालयाचं मोठं नुकसान ही करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या रुग्णालया समोरच पोलिस स्टेशनही आहे. अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. तोडफोड करण्याचं कारण सांगतान वंचितने रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली शहरात विश्रामबाग चौक आहे. इथे डॉक्टर शरद सावंत यांचे आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. शहरातील प्रसिद्ध रुग्णालया पैकी हे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात शासकीय योजने अंतर्गत उपचार केले जातात. मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार केल्यानंतर ही रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत. असा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केला आहे.
याबाबत रुग्णालयाला अद्दल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रुग्णालयाच्या काचा फोडल्या. रुग्णालयातील साहित्यांची नासधूस केली. रुग्णालयात कार्यकर्ते अचानक आल्याने रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडाली. शिवाय सर्वत्र खळबळ उडावी. काही वेळ काय चाललं आहे हे कुणालाही समजलं नाही.
दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून वंचित बहुजन आघाडीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारी योजनेतल्या लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नाही. असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या समोरच हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल फोडत असताना पोलिसांना याची कोणतीच माहिती समजली नाही असं बोललं जात आहे. विश्रामबाग पोलीस त्यावेळी काय करत होते, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.