मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पार पडला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, लेखक जावेद अख्तर आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या या पुस्तकाचे कौतुक करत विरोधकांवर निशाणा साधला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शरद पवार?
"संजय राऊत नेहमीच सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात. ती त्यांची लेखणी काही लोकांना पटत नव्हती. ते अस्वस्थ होते, संधीची वाट पाहत होते, त्यांना संधी दिली ती पत्राचाळ प्रकरणाने. महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. म्हणून संजय राऊतांनी केंद्र सरकारला पत्र लिहले. कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावे लागले," असे शरद पवार म्हणाले.
तसेच "हे पुस्तक वाचल्यानंतर जेलमधली खरी स्थिती समजते. एकनाथ खडसेंचे जावई इंग्लडमध्ये होते. खडसेंवर तक्रार झाली आणि त्यांना त्रास होईल असं कळल्यानंतर ते इथे आले. त्यांना तात्काळ ईडीने अटक केली. त्यांचा काहीही संबंध नव्हता. अनेक लोक त्याठिकाणी होते. अनिल देशमुखांवरही एका शासकीय अधिकाऱ्याने तक्रार केली की ह्यांनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.शेवटी ती केस 1 कोटीवर आली. अशी अनेक नावे सांगता येतील. मला एका गोष्टीची गंमत वाटली की ही सगळी मंडळी त्रास होता तरी नमले नाहीत एकमेकांना धीर देत राहिले," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
नक्की वाचा- मोदी सरकारनं शशी थरुर यांच्यावर सोपावली नवी जबाबदारी, अमेरिकेत फाडणार पाकिस्तानचा बुरखा)
"हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे दोन दिवसांपासून आपण पाहतोय. मला आश्चर्य वाटते सत्ताधाऱ्यांना न वाचता कसे हे पुस्तक समजले. गेली दोन दिवस सतत त्यांच्यावर टीका होत आहे. हे पुस्तक पाहिल्यानंतर समजलं की सत्तेचा गैरवापर कसा होतो याचे उत्तम लिखान महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडले आहे. देशातले विरोधक उध्वस्त करायचे असेच ठरवले होते ज्याचे परिणाम अनेकांना सहन करावे लागले. हे पुस्तक जे कोणी वाचतील त्यांनी याकडे गांभीर्याने बघायची गरज आहे.निवडणूका येतात जातात मात्र लोकव्यवस्था ही आदर्श असली पाहिजे. संजय राऊतांनी हे पुस्तक लिहून मोठे काम केले, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.