Sansad Ratna Award 2025 Delhi: प्राइम फाउंडेशनच्या वतीनं लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार सोहळा राजधानी दिल्ली इथं संसदीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांच्या उपस्थितीत पार पडला. देशातील 17 खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांना हा पुरस्कार दिला गेला. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी बाजी मारली आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने या खासदारांच्या कामाचं मुल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला आहे. या वर्षी 17 खासदारांना पुरस्कार देण्यात येणार असून यंदाच्या पुरस्कारामध्ये ज्युरी समितीने चार विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे.
हे पुरस्कार खासदारांनी केलेल्या "संसदीय लोकशाहीमध्ये उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी दिले जाणार आहेत. ज्या खासदारांनी 16 व्या आणि 17 व्या लोकसभेच्या कार्यकाळात सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्यांची कामगिरी १८ व्या लोकसभेतही सर्वोत्तम राहिली आहे... अशा खासदारांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोणाला मिळणार पुरस्कार...
भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा)
एन.के. प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ)
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी सपा, महाराष्ट्र)
श्रीरंग आप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील इतर खासदारांनाही पुरस्कार...
स्मिता उदय वाघ (भाजप)
अरविंद गणपत सावंत (शिवसेना यूबीटी)
नरेश गणपत म्हस्के (शिवसेना)
प्रा.गायकवाड वर्षा एकनाथ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी (भाजप)
भाजप खासदार प्रवीण पटेल, भाजप खासदार रवी किशन, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, भाजप खासदार बिद्युत बरन महतो, भाजप खासदार पी.पी. चौधरी, भाजप खासदार मदन राठोड, डीएमके खासदार सी.एन. अण्णादुराई आणि भाजप खासदार दिलीप सैकिया यांना जाहीर झाला आहे राज्यनिहाय विचार केला तर यावर्षी महाराष्ट्रातील ७ खासदारांना पुरस्कार मिळाले असून उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानला प्रत्येकी २ खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाले आहेत. ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यातील प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
संसदेत सादर केलेल्या अहवालांच्या आधारे स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. अर्थविषयक स्थायी समिती, अध्यक्ष भर्तृहरी महताब (भाजपा, ओडिशा) आणि कृषीविषयक स्थायी समिती, अध्यक्ष डॉ. चरणजित सिंग चन्नी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजाब) यांना जाहीर झाले आहेत.
प्राइम फाउंडेशन काय आहे?
1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निर्देशावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो . तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो.
केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.