बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान एसआयटीने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले असून थेट अमेरिका कनेक्शन समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडवर सुनावणी पार पडली. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. तसेच वाल्मिक कराडचे अमेरिका कनेक्शन असल्याचेही म्हटले आहे. वाल्मिक कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिमकार्डवरुन काही लोकांना फोन केले गेले, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती कारणं होती, याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे. यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचे एसआयटीने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान एसआयटीने 10 महत्त्वाचे मुद्दे मांडत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
( नक्की वाचा : Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story )
संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबरला खून झाला. या वेळी दुपारी 3.20 ते 3.30 या दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांचं संभाषण झालं आहे. SIT कडे याबाबत CDR उपलब्ध असल्याने या खंडणी प्रकरणाचा थेट संबंध हत्येचशी असल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरणाची 3 ते 3.15 दरम्यान झाले आणि साडेतीन वाजता दरम्यान कराड आणि घुले तसेच विष्णू चाटे यांचा फोन कॉल झाला असं कोर्टात एसआयटीने म्हटले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.