मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh Murder case यांच्या हत्येनंतर संपुर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्वच घटक रस्त्यावर उतरले आहे. गल्ली पासून ते अगदी दिल्लीपर्यंत हे प्रकरण गाजत आहे. नागपूर इथं विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही विरोधकांपासून अगदी सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या प्रकरणाला हात घातला. दोषीवर कडक कारवाईची मागणी झाली. मुख्यसुत्रधार कोण अशी विचारणा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर माढा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनं राज्यातील प्रत्येकाचेच कान टवकारले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण बाबर हे माढा तालुक्यात राहतात. ते पेशाने शेतकरी आहेत. त्यांची शेती आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आणि महाराष्ट्राला डाग लावणारा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी ज्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली, त्या आरोपीचा जो कोणी एन्काऊंटर करेल त्याला 51 लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. ऐवढेच नाही 51 लाखा शिवाय पाच एकर जमिन बक्षिस देण्याचीही घोषणा केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - बीड सरपंच हत्या प्रकरण! CM फडणवीसांचा मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार
एन्काऊंटर करता आला नाही. पण त्या आरोपीला जो कोणी पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी अटक करून दाखवेल त्याला 2 लाखाचे बक्षिस देण्याची घोषणाही बाबर यांनी केली आहे. त्यांच्या या बक्षिसाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. त्यांनी ही केवळ घोषणा केली नाही. तर त्यांनी याबाबतचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर केले आहे. त्याची प्रत ही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहेत. बाबर यांनी हे बक्षिस जाहीर केल्यानंतर त्यांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पण हा मनात ला राग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एखादा माणूस एवढा क्रूर कसा असू शकतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचा अतिशय निर्घुण पणे खून करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाकीचे आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणी आता एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे. पण मुख्य सुत्रधार कोण याची विचारणा आजही होत आहे. बीड जिल्ह्यात ज्या लोकांची प्रचंड दहशत आहे त्यांना चाप लावला गेला पाहीजे अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणात कोणी असो. कितीही मोठा असो त्याला सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यात आता बाबर यांनी जी बक्षिसाची घोषणा केली आहे, त्याचे काय पडसाद उमटतात ते पहावे लागेल.