Beed Politics: राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; संतोष देशमुख प्रकरणानंतर मोठा निर्णय, धनंजय मुंडेंना धक्का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादानंतर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 स्वानंद पाटील, बीड:  बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादानंतर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. महत्त्वांच म्हणजे बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Sharad Pawar vs Amit Shah : शरद पवार अमित शाहांना हिणवतात 'ते' प्रकरण काय आहे? )

दरम्यान, एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धनंजय मुंडेंमुळेच वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. अशातच आता बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्याने धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Advertisement