देवा राखुंडे, बारामती: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत राज्यभर मोर्चे निघत आहेत. आज बारामती शहरामध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी झाले होते. यावेळी धनंजय देशमुख यांना भावाच्या आठवणीने अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय देशमुखांचा वाढदिवस, मंचावर ढसढसा रडले
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बारामतीमध्ये आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या बंधूंसाठी जमा झालेली हजारोंची गर्दी पाहून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मंचावर अश्रू अनावर झालेत. कार्यक्रम संपला त्यावेळी उपस्थिती गर्दी पाहून धनंजय देशमुख हे मंचावर ढसाढसा रडले.
बारामतीकरांचेही डोळे पाणावले...
आज खरं तर धनंजय देशमुख यांचा वाढदिवस आहे. मात्र आपल्या बंधूंच्या जाण्याने त्यांची पोकळी मी कधीच भरून काढू शकत नाही अशी प्रतिक्रिया ही धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंचावरील संतोष देशमुख यांचा फोटो पाहून धनंजय देशमुख अक्षरशा ढसाढसा रडले. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या फोटोच्या पुढे ते नतमस्तक देखील झाले. संतोष देशमुख आणि वैभवी देशमुखांचे दुःख पाहून मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक बारामतीकराचे डोळे पाणावले.
धनंजय देशमुखांचे बारामतीकरांना आवाहन..
"बीड जिल्ह्यात नेमकं काय घडलं आहे हे इथल्या अनेकांना माहित नाही. राजकीय पाठबळ नेमकं कोणाला दिलं जात आहे. एका सामान्य माणसाला कसं संपवलं गेले, मी न्यायाची भीक मागत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने घ्यावे. आमच्या सोबत कायम रहा,आमच्याकडून काहीही चुकणार नाही," असे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले.
तसेच "वाल्मीक कराड सांगेल तोच गुन्हा दाखल होतो अशी बीड जिल्ह्यात परिस्थिती आहे. आज देखील भीतीयुक्त वातावरण आहे. यांचं खूप मोठ गुन्हेगारीचे जाळ आहे. आमच्या सोबत कायम रहा, आमच्याकडून काहीही चुकणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप केला याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार.." असंही धनंजय देशमुख म्हणाले.