School Holiday In Mumbai: 19 ऑगस्ट रोजी शाळा कॉलेजना सुट्टी मिळणार? उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज

Red Alert For Mumbai: भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने 14 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली होती आणि शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात तुफान पाऊस झाला आहे. 19 ऑगस्ट रोजीही मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेने दुपारच्या सत्रात म्हणजे 12 नंतर भरणाऱ्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली. 19 ऑगस्ट रोजी म्हणजेच मंगळवारीही रे़ड अलर्ट जारी केला असल्याने शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर करणार का ? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. 

सोमवारी शाळा, कॉलेजसाठी काय घोषणा केली ? 

मुंबई महानगरपालिकेने सोमवार आणि मंगळवारसाठी रेड अलर्ट असल्याचे जाहीर करत असतानाच म्हटले की, "भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी (मुंबई शहर व उपनगरे) दिनांक 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर केली आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

सूचना देऊन उपयोग काय?

संतप्त नागरिकांचा सवाल महापालिकेने हे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी महापालिकेला सवाल केले आहेत. 12 वाजेनंतर भरणाऱ्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय तुम्ही साडेअकरा वाजता जाहीर करत आहात, त्याचा उपयोग काय ? असा एका व्यक्तीने X वरच महापालिकेला सवाल केला आहे.

दुसऱ्या एकाने म्हटलंय की शाळा तुमचे आदेश मानतच नाही तर उपयोग काय अशा आदेशांचा ?

मंगळवारी शाळा, कॉलेजना सुट्टी मिळेल ?

X वर मुंबई महानगरपालिकेने या आदेशाबद्दलची माहिती दिल्यानंतर लोकांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की मंगळवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर मंगळवारी तुम्ही शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करणार का ?

Advertisement