Shirdi News: साईबाबांच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान! फक्त 3 दिवसात 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा वाचून थक्क व्हाल

तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तब्बल 3 लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर साईंच्या चरणी भाविकांनी 7 कोटी 81 लाखांच महादान अर्पण केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी:

Shirdi Saibaba Temple News:  शिर्डीतील साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सवाला यंदाही देश-विदेशातील साईभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तब्बल 3 लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर साईंच्या चरणी भाविकांनी 7 कोटी 81 लाखांच महादान अर्पण केले आहे. साई संस्थानच्या वतीनं तीन दिवसांची मोजदाद करण्यात आल्यानंतर अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

साईबाबाच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान!!!

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरु पौर्णिमा उत्सव 2026 ला देश-विदेशातील साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 28 ते 30 जुलै 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे 3 लाख भाविकांनी शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या तीन दिवसांच्या उत्सवात साई संस्थानला विविध माध्यमांतून एकूण 7 कोटी 81 लाख 13 हजार 377 इतकी देणगी प्राप्त झाली.

Advertisement

त्यामध्ये दक्षिणा पेटीतून 2 कोटी 4 लाख 35 हजार 557, दान काऊंटरमधून 1 कोटी 25 लाख 47 हजार 935, पीओएस मशीनद्वारे 87 लाख 14 हजार, तर ऑनलाईन आणि यूपीआय माध्यमातून 2 कोटी 7 लाख 84 हजार 701 इतकी देणगी जमा झाली. याशिवाय विदेशी चलन स्वरूपात 5 लाख 65 हजार 991 ची देणगी प्राप्त झाली. रोख देणगीबरोबरच भाविकांनी 1,125.570 ग्रॅम सोने आणि 2,376.500 ग्रॅम चांदी अर्पण केली. सोन्याची अंदाजे किंमत ₹1 कोटी 46 लाख 74 हजार 544, तर चांदीची किंमत ₹3 लाख 90 हजार 649 इतकी आहे.

इंदूर- मुंबई फक्त 8 तासात! 309KMचा रेल्वेमार्ग, मध्यप्रदेश- महाराष्ट्रातील 8 जिल्हे जोडणार; काय आहे मेगाप्लॅन?

गुरुपोर्णिमेला भाविकांची मोठी देणगी

उत्सवादरम्यान संस्थानच्या प्रसादालयात 1 लाख 94 हजार 285 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच 39 हजार 611 अन्न पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. लाडू प्रसादालाही मोठा प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत 2 लाख 36 हजार 912 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्यातून 71 लाख 7 हजार 360 इतके उत्पन्न मिळाले. याशिवाय 1 लाख 65 हजार 200 मोफत बूंदी प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले.

देशासह अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेपाळ, ओमान, कतार, मलेशिया, मॉरिशस, स्वित्झर्लंड यांसह 14 देशांतील साईभक्तांनी विदेशी चलनाच्या माध्यमातून देणगी अर्पण केली. धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, भजन-कीर्तन आणि विविध आध्यात्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण शिर्डी भक्तिरसात न्हाऊन निघाली.साई संस्थानने दर्शन, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, निवास आणि वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन केल्यामुळे तीन दिवसांचा गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत आणि उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.