अमोल सराफ, बुलढाणा
Shivaji Kon Hota Book Controversy: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एका वेगळ्याच मागणीने खळबळ उडवून दिली आहे. दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी थेट बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केवळ बंदीच नव्हे, तर या पुस्तकाच्या छपाईशी संबंधित डीटीपी ऑपरेटरला अटक करावी, प्रकाशकाची मालमत्ता जप्त करावी आणि लेखक गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी अजब आणि आक्रमक मागणी आ. गायकवाड यांनी केली आहे...
काय आहेत निवेदनातील 10 प्रमुख मागण्या?
- एकेरी उल्लेखावर आक्षेप: 'शिवाजी कोण होता' असे नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी: या पुस्तकाचे लेखक (दिवंगत गोविंद पानसरे) यांच्यावर मरणोत्तर फौजदारी केस करावी. तसेच वितरक प्रशांत आंबी यांना अटक करावी.
- डीटीपी ऑपरेटर आणि सॉफ्टवेअरवर कारवाई: ज्यांनी हे पुस्तक टाईप केले त्या डीटीपी ऑपरेटरला अटक करावी आणि ज्या संगणकावर हे झाले तेथील मालमत्ता आणि डीटीपी सॉफ्टवेअरही जप्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- परकीय फंडिंगची CID चौकशी: या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकाला चीन किंवा पाकिस्तान सारख्या देशांमधून फंडिंग आले आहे का? तसेच हे पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहाद्याने मदत केली? याची सखोल सीआयडी (CID) चौकशी व्हावी.
- प्रेस कौन्सिल आणि RNI मंजुरी: या पुस्तकाला प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि RNI ची मंजुरी आहे का, याची तपासणी करावी आणि नसल्यास मुद्रकाचे प्रेस मशीन जप्त करून त्यांची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी या निवेदनाद्वारे कोल्हापुरातील प्रकाशक आणि मुद्रकांवर थेट अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या गायकवाडांच्या या नव्या आणि वेगळ्या मागणीमुळे आता राजकीय आणि साहित्यिक वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.