Saamana Editorial ON PM Modi China Tour: विदेशात मोदींचा डंका वाजवतो हे चित्र फसवे आहे. जे अनिवासी लोक परदेशात मोदींचा जयजयकार करीत आहेत, त्यांना भारतातील स्थिती व लोकभावनांची कल्पना नाही, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावरुन ही खरमरीत टीका करण्यात आली असून मोदींच्या विदेश नितीवरुनही जोरदार टीका केली आहे.
काय आहे सामना संपादकीय?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीप्रमाणे विदेश दौऱ्यावर आहेत. आधी ते जपानला गेले व नंतर चीनला दाखल झाले. जपान आणि चीनमधील अनिवासी भारतीयांनी त्यांचे म्हणजे जल्लोषात स्वागत केले. 'झिंदाबाद' वगैरे घोषणा दिल्या. मोदी यांना सध्याच्या स्थितीत भारतात राहणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रतिष्ठेला आणि उरल्यासुरल्या विश्वासार्हतेला ग्रहण लागले आहे," अशी टीका सामना संपादकीय मधून करण्यात आली आहे.
तसेच "मोदी यांनी भारतात लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून सत्ता मिळवली. निवडणूक आयोगाशी भागीदारी करून निवडणुका जिंकल्या. मतांची चोरी केली. लोकांना फसवून मोदी हे पंतप्रधान झाल्याची वाटचाल राहुल गांधी यांनी उठवली. ती अर्थात विदेशातही पोहोचलेलीच असणार. त्यामुळे विदेशात मोदींचा डंका वाजवतो हे चित्र फसवें आहे. जे अनिवासी लोक परदेशात मोदींचा जयजयकार करीत आहेत, त्यांना भारतातील स्थिती व लोकभावनांची कल्पना नाही. मोदी आले म्हणून भाजपच्या विदेशी शाखेने जमा केले हे लोक असतात," असा दावाही यामध्ये करण्यात आले आहे.
"मोदी यांनी आता जपान, चीनला जाऊन काय केले? जपानमधून मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांना फोन लावला व रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा केली. शांतता, मानवता वगैरे अशा भूमिकांवर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्याचे मोदी यांनी स्वतः जाहीर केले. म्हणजे मोदी यांनी नक्की काय केले? रशिया व युक्रेन यांच्यातले युद्ध संपले नाही. मोदी हे झेलेन्स्की यांच्याशी बोलत असताना रशियाने युक्रेनवर सर्वात मोठ्या युद्धनीकेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली," असंही यामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, "मोदी यांना सततच्या विदेश पर्यटनाची चटक लागली आहे. त्यासाठी भारताची परकीय चलनातची गंगाजळी रसातळाला गेली आहे. पुन्हा इतके करुन एकही देश 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. आता चीन तरी काय करणार? लडाख, लेहच्या जमिनीवर चीनने आधीच अवैध ताबा घेतला आहे. अरुणाचलमधील त्याची घुसखोरी सुरुच आहे व भारताविरोधात पाकिस्तानला बळ देण्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. चीनने हे थांबवावे व भारताबरोबर नव्या मैत्री पर्वाला सुरुवात करावी असे सांगण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही. कारण ट्रम्प यांच्या सावटाखाली मोदींचे परराष्ट्र धोरण आजही सरपटते आहे," असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.
(नक्की वाचा - Political news: मोहम्मद अजहरुद्दीन मंत्री होणार? कसं होणार शक्य, काय आहे गणित?)