गुरु दळवी, सिंधुदुर्ग:
Sindhudurg Politics: राज्यात सध्या जिल्हा परिषद- पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे. विकासाचा निधी मीच देणार कारण तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत, निधी फक्त भाजप आणि शिवसेनेला मिळणार, असं नितेश राणे म्हणालेत.
नितीश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
भाजप नेते नितेश राणे यांनी निधी वाटपाबाबत केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद पेटला आहे. कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी निधी फक्त भाजप- शिवसेनेलाच दिला जाईल, असं विधान केले आहे. निधी कमळ आणि धनुष्यबानलाच मिळणार. उबाठाचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी पण परत मागे घेणार. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून दया, असं ते म्हणाले.
निधी भेटण्याचा प्रश्न नाही..
" शेवटी मी ज्याला बोलणार त्यालाच निधी भेटणार आहे. दुसऱ्यांना निधी भेटण्याचा प्रश्नच राहत नाही. आपला हात आखडता आहे, चिन्ह बघून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणाचा आहे तर निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला तर असलेला निधी कमी करुन टाकतो. तेव्हा मी ग्रामपंचायतीलाही सांगितलेलं भाजपचा सरपंच द्या अन्यथा एकही रुपया भेटणार नाही, फटाफट सगळे सरपंच बसले, तसाच हा विषय आहे," असं नितेश राणे म्हणालेत.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गमध्ये जोरदार धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. सतीश सावंत यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी भाजपात प्रवेश केला. सतीश सावंत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.