SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करून आता 4 दिवस उलटले आहेत. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला, तर काहींनी पुढील प्रवेशाची तयारी सुरू केली. मात्र, याच गर्दीत असेही काही दुर्दैवी विद्यार्थी आहेत, ज्यांच्यासाठी निकालाचा दिवस अजून संपलेलाच नाही.
कोणताही गैरप्रकार केलेला नसतानाही शेकडो विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने राखून ठेवल्याने या मुलांच्या डोळ्यांतील पाणी थांबायला तयार नाही. आनंद साजरा करायच्या दिवसात ही मुले आणि त्यांचे पालक सध्या प्रचंड मानसिक तणावात वावरत आहेत.
निकाल असूनही दिसेना आणि बोर्डाकडे उत्तर मिळेना
राज्य मंडळाने 8 मे रोजी ऑनलाईन निकाल जाहीर केला, पण शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या निकालाच्या जागी फक्त प्रतीक्षा पाहावी लागली. पुणे विभागीय मंडळात अशा 117 विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक कारणास्तव किंवा अन्य प्रशासकीय त्रुटींमुळे राखून ठेवण्यात आला होता.
आश्चर्य म्हणजे, या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सांगण्यासाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना चक्क व्हॉट्सॲपचा आधार घ्यावा लागला. निकालाच्या दिवशी बोर्डाचे कर्मचारी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात बसून ही माहिती पोहचवत होते. मात्र, तरीही अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
( नक्की वाचा : Pune News: आई-वडिलांचं मौन मुलीच्या जीवावर बेतलं; पुण्यात 18 वर्षांच्या श्रुतीचा भयंकर शेवट ! नेमकं काय घडलं? )
पालक हतबल आणि विद्यार्थ्यांचे जेवण सुटले
निकाल का दिसत नाही, याचे उत्तर ना शाळेकडे आहे ना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर. भोसरी येथील रहिवासी संदीप थोरात यांची मुलगी अद्याप आपल्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. 4 दिवस झाले तरी बोर्डाकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी सतत फोन करून विचारत असल्याने मुलीला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशीच भीषण स्थिती मुंबई विभागीय मंडळातून परीक्षा दिलेल्या आकांक्षा नाईक हिची आहे. निकाल न लागल्याच्या धक्क्याने आकांक्षाने चक्क जेवण सोडले असून तिचे वडील हतबल झाले आहेत.
( नक्की वाचा : Shirdi News: 100 कोटींचा किराणा अन् 'असा' दर्जा? साई संस्थानच्या प्रसादालयातील 'त्या' पाहणीने खळबळ )
जेजुरीच्या श्रेयाचीही हीच कहाणी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकर हिची अवस्थाही काही वेगळी नाही. श्रेयाला अद्याप तिचा निकाल मिळालेला नाही. बोर्डाच्या दारात चकरा मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न श्रेयाचे पालक विचारत आहेत. सामान्यतः कॉपी केस किंवा परीक्षेतील गैरप्रकारानंतर निकाल राखीव ठेवला जातो, पण इथे कोणताही दोष नसताना विद्यार्थ्यांना का वेठीस धरले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
नेमकी अडचण काय?
या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कोलमडले आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असताना निकाल हातात नसल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. बोर्डाने सोमवारी या प्रकरणावर स्पष्टीकरण देऊ असे आश्वासन दिले असले तरी, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला हा मानसिक छळ मुलांच्या भविष्यावर परिणाम करणारा ठरत आहे.