गाव तिथे एसटी हे समिकरण अनेक वर्षापासून आहे. गावागावांना जोडणार दुवा म्हणजे एसटी बस. मात्र ज्या गावांमध्ये ही एसटी जाते त्या गावात जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती सध्या अतिशय वाईट आहे. तरही विद्यार्थी गावकरी यांची गैरसोय होवू नये म्हणून एसटी प्रशासनाकडून बस गावापर्यंत सोडली जाते. पण आता तसं होणार नाही. गावात जाणारा रस्ता चांगला नसेल तर त्या गावात जाणाऱ्या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात येतील. असं पत्रच संबंधीत गावच्या संरपंचाना धाडण्यात आलं आहे. या पत्राने एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यात. अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला अकोला एसटी आगाराने पत्र दिले आहे. त्या द्वारे गावात येणाऱ्या एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचं कळवण्यात आलं आहे. अकोल्यातल्या धामणा ते हातरून हा 10 किमीचा रस्ता पूर्ण पणे खड्ड्यात आहे. त्यामुळे बसचं ही नुकसान होतं. शिवाय अशा रस्त्यावरून प्रवास करणं हे धोक्याचं ही आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकल्या सारखं आहे. त्यामुळेच अकोला 'एसटी डेपो'नं मोठं पाऊल उचललं आहे.
नरेश खंडारे हे अकोल्याचे मध्यवर्ती बस व्यवस्थापक प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की अकोल्यातल्या 'धामणा' आणि 'बोरगाव वैराळे' या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झाला आहे. याबाबत चालकांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या गावातील बससेवा बंद होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. या दोन्ही ग्रामपंचायतींना याबाबत पत्र लिहीले असल्याचं त्यांनी सांगितलं. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असं पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांसह मोठा धक्का बसला आहे. गावाची बस सेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस सेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा, असा आग्रह आता गावकरी धरत आहेत. अकोला ते धामणा रस्त्यावर दिवसभरात तीन वेळा बस फेऱ्या सुरू आहेत. पण रस्ते खराब असल्यामुळे यागावात जाण्यासाठी तासापेक्षा जास्त वेळ लागत आहे. दरम्यान ग्रामपंचायती हे रस्ते कसे दुरुस्त करणार हा खरा प्रश्न आहे. याकडे खऱ्या अर्थाने सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर या गावांचा मुख्य शहराशी संपर्कच तुटण्याची भिती निर्माण झाली आहे.