Ladki Bahin Yojana application rejected solution: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही अनेक महिला अशा आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे अडकले आहेत किंवा बाद झाले आहेत. जर तुमच्या अर्जाचे स्टेटस 'Rejected' किंवा 'In Review' असे दिसत असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही.
काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सक्रिय करू शकता आणि रखडलेले पैसे मिळवू शकता. तुमचा अर्ज नेमका कुठे अडकला आहे आणि तो कसा दुरुस्त करायचा, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अर्ज इन रिव्ह्यू किंवा रिजेक्ट असल्यास काय करावे
तुम्ही अर्जाचे स्टेटस तपासले आणि तिथे 'In Review' असे दिसत असेल, तर याचा अर्थ तुमची कागदपत्रे सध्या पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत. सामान्यतः ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होते, पण जर 15 दिवसांपेक्षा जास्त काळ हेच स्टेटस दिसत असेल, तर तुम्ही तातडीने जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्जाचा फॉलो-अप घ्यायला हवा.
दुसरीकडे, तुमचा अर्ज 'Rejected' म्हणजेच बाद झाला असेल, तर घाबरून न जाता त्याचे कारण शोधणे गरजेचे आहे. अनेकदा अस्पष्ट फोटो, अर्जातील नावातील चूक, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा उत्पन्नाची चुकीची माहिती भरल्यामुळे अर्ज नाकारले जातात.
( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
अर्ज दुरुस्त करण्याची सोपी पद्धत
तुमचा नाकारलेला अर्ज तुम्ही स्वतः मोबाईलवरून दुरुस्त करू शकता. यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील नारीशक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन करा. तिथे 'Applied Applications' या पर्यायावर गेल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल. अर्जासमोर असलेल्या 'Edit' किंवा 'दुरुस्त करा' या बटणावर क्लिक करा. तिथे तुमचा अर्ज का नाकारला आहे, याचे स्पष्ट कारण दिलेले असेल.
ते कारण नीट वाचून त्यानुसार आवश्यक ते बदल करा. जर कागदपत्रे अस्पष्ट असतील, तर नवीन आणि स्वच्छ फोटो अपलोड करा आणि 'Update/Submit' बटणावर क्लिक करा. यानंतर तुमचा अर्ज पुन्हा पडताळणीसाठी पाठवला जाईल.
( नक्की वाचा : Mumbai-Nashik Local : 18 बोगदे, सह्याद्रीच्या रांगा आणि 3 प्रमुख स्टेशन; मुंबई-नाशिक लोकल कशी धावणार? वाचा )
ई-केवायसी स्टेटस तपासणे का आहे महत्त्वाचे?
अनेक महिलांचा अर्ज मंजूर झालेला असतो, तरीही त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे अपूर्ण 'e-KYC' किंवा बँक खात्याची तांत्रिक अडचण असू शकते. तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे तपासण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपमधील अर्जाच्या नावापुढे 'e-KYC Completed' किंवा 'Verified' असे लिहिले आहे का ते तपासा.
तसेच, तुमचे बँक खाते आधारशी 'Active' जोडलेले असणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 'Bank Seeding Status' तपासू शकता किंवा थेट तुमच्या बँकेत जाऊन खाते 'NPCI Mapping' किंवा 'DBT' (थेट लाभ हस्तांतरण) साठी सक्रिय आहे का, याची खात्री करू शकता.
ही महत्त्वाची अट लक्षात ठेवा
योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते सुरू असणे आणि त्याला आधार लिंक असणे ही सर्वात महत्त्वाची अट आहे. जर तुमचे खाते बऱ्याच दिवसांपासून बंद असेल किंवा केवायसी अपडेट नसेल, तर सरकारकडून पैसे पाठवले तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे तुमचा अर्ज दुरुस्त करण्यासोबतच बँकेतील व्यवहारही तपासून घ्या, जेणेकरून रखडलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world