गुरूप्रसाद दळवी
गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचा अंत ठरलेलाच असतो. प्राणज्योत मालवल्यानंतर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. याच स्मशानभूमीत कुणी दिवाळी साजरी करत असेल तर? तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. पण एक अशी स्मशानभूमी आहे जीथं एक अवलीया आताच नाही तर गेल्या 12 वर्षापासून स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आहे. ना नात्याचे, ना गोत्याचे पण, या मृतात्म्यांचे स्मरण करणारा हा व्यक्ती कौतूकाचा विषय ठरला आहे. सध्या दिवाळी होत आहे. पण ही व्यक्ती या स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आहे. त्यामागची त्याची भूमीका ही कौतूक करण्या सारखीच आहे.
मारुती निरवडेकर असं या व्यक्तीचं नाव आहे. ते सावंतवाडीत राहातात. शिवाय ते सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गेल्या बारा वर्षापासून काम करत आहेत. ते या स्मशानभूमीत दिवाळीचे पाचही दिवस पणत्या लावतात.आकाशदिव्यांसह स्मशानभूमीला विद्यूत रोषणाई करत, स्मशानात दिवाळी सण साजरा करतात. मृतात्म्यांचे स्मरण यानिमित्ताने त्यांच्याकडून केलं जातं. मृत आत्म्यांनाही दिवाळी करता यावी हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे. सावंतवाडी नगरपरिषदच्या उपरलकर स्मशानभूमीत मारूती निरवडेकर गेली बारा वर्ष कार्यरत आहेत.
नक्की वाचा - Pune News: शनिवार वाड्यात नमाज पठण! ट्वीटमुळे ट्वीस्ट, त्या व्हिडीओ मागचे सत्य काय?
अहोरात्र ते इथे सेवा देत असतात. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. अग्नी देऊन नातेवाईक घरी गेल्यानंतर देखील मृतदेहाची राखण ते करतात. सारी भरण्यापासून ते दशक्रीया विधीपर्यंत त्यांची मदत दुःखात असलेल्या कुटुंबास होते. यात त्यांना त्यांची सौभाग्यवती या देखील सहकार्य करतात. स्मशानभूमीची देखभाल राखणे, स्वच्छता करणे, परिसरातील झाडांची निगा राखणे ही कामं ते करतात. दिवाळी निमित्त ते गेली 12 वर्ष स्मशानभूमीत आकाशदिवे, विद्युत रोषणाईसह दिवे लावतात. यात त्यांना मोठं समाधान ही मिळतं.
त्याच बरोबर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीजेपर्यंत ते नेमाने हे काम करतात. मृत व्यक्तीचं स्मरण मी यानिमित्ताने करतो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून मी हे कार्य करतो असं निरवडेकर आवर्जून सांगतात. विशेष म्हणजे, कोरोना सारख्या महामारीत निर्बंधांमुळे रक्ताची माणसं मुखाग्नी देऊ शकत नव्हती. काहीजण तर ते धारिष्ट्यही दाखवत नव्हते. तेव्हा, हेच मारूती निरवडेकर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. त्यांच्या या कार्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून देखील सन्मान करण्यात आला आहे.