Sunetra Pawar NCP President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. केवळ पक्षच नव्हे, तर पवार कुटुंबाचे राजकीय भवितव्यही आता त्यांच्या निर्णयांवर अवलंबून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्यासमोरची 5 प्रमुख आव्हानं आहेत.
1. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न
सुनेत्रा पवार यांच्यापुढील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (SP) आणि त्यांचा स्वतःचा पक्ष यांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेणे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची भावना प्रबळ झाली आहे. मात्र, हे विलिनीकरण करताना पक्षाचे चिन्ह, नाव आणि सत्तेतील वाटा यावर सन्मानजनक तोडगा काढणे ही त्यांची मोठी कसोटी असेल. हा निर्णय केवळ पक्षासाठीच नाही, तर पवार कुटुंबातील एकजूट दाखवण्यासाठीही महत्त्वाचा ठरेल.
या भावनिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील मुद्यावर योग्य निर्णय घेणे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.
2. अजित पवारांचा करिश्मा टिकवून स्वतःची ओळख निर्माण करणे
अजित पवार यांची कार्यपद्धती अत्यंत वेगवान आणि आक्रमक होती. त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांना तोच विश्वास देणे सुनेत्रा पवार यांच्यासाठी गरजेचे आहे. केवळ 'अजित पवारांच्या पत्नी' ही ओळख मागे टाकून, एक सक्षम प्रशासक आणि कणखर पक्षप्रमुख म्हणून स्वतःचा ठसा उमटवणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना 'दादां'ची कमतरता भासू न देणे, हेच त्यांच्या यशाचे गमक असेल.
( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )
3. मातब्बर मराठा आणि मराठेतर नेत्यांचा समन्वय साधून मोट बांधणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरागत व्होट बँक टिकवून ठेवतानाच, पक्षातील मातब्बर मराठा नेत्यांना सोबत ठेवणे हे सुनेत्रा पवारांसाठी महत्त्वाचे असेल. त्याच वेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांसारख्या वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज मराठेतर नेत्यांना विश्वासात घेऊन पक्षाची मोट एकत्र ठेवणे हे त्यांच्या संयमाचे आणि मुत्सद्देगिरीचे मोठे आव्हान आहे. या सर्व नेत्यांची आपापल्या क्षेत्रात मोठी ताकद आहे, त्यांना एकत्र बांधून ठेवण्यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
4. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे
अजित पवार यांच्या अपघाती आणि धक्कदायक निधनानं बॅकफुटवर गेलेल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला नवी ऊर्जा देण्यासाठी सुनेत्रा पवार यांना रणशिंग फुंकावे लागेल. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही पक्षाचा विस्तार करणे ही त्यांची जबाबदारी असेल.
पक्षामधील महिला संघटन आणि तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचे काम त्यांना करावे लागेल. सुनेत्रा पवार यांनी सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे महिलांशी त्यांचा संपर्क चांगला आहे, मात्र त्याचे रुपांतर मतांमध्ये आणि सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये करणे हे महत्त्वाचे ठरेल.
( नक्की वाचा : 41 वर्षांचं सामाजिक तप अन् आता मोठी जबाबदारी; Sunetra Pawar: कशा ठरल्या बारामतीच्या विकासाच्या शिलेदार? )
5. महायुतीमध्ये पक्षाचे स्थान आणि वजन कायम राखणे
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून वाटाघाटी करताना, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासमोर आपल्या पक्षाचा प्रभाव कमी होऊ न देणे हे मोठे आव्हान आहे. आगामी निवडणुकांमध्ये सन्मानजनक जागा मिळवणे आणि सत्तेत आपला शब्द प्रमाण मानला जाईल याची काळजी त्यांना घ्यावी लागेल.