रेवती हिंगवे, पुणे: पुण्याच्या स्वारगेट स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गेल्या 24 तासांपासून फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पुण्यात दुष्कृत्य करून तो सकाळी आपल्या गावी आला आणि दुपारपर्यंत तो आपल्या घरीच मुक्कामी होता अशी माहिती समोर आली आहे. आता या आरोपीच्या लोकेशनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेच्या लोकेशनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दत्तात्रय गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट येथील उसाच्या शेतात तो लपून बसल्याची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यास सुरुवात केली आहे.
शिरूर तालुक्यातील गुणाट येथे आरोपी दत्तात्रय गाडे याचा ड्रोन कॅमेरा मार्फत शोध सुरू आहे. तसेच याच ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे काही तासांमध्ये नराधमाच्या मुसक्या आवळण्यात येतील, असं सांगण्यात येत आहे.