Rishiraj Sawant : मित्राची सासरवाडी की....; ऋषिराज सावंत बँकॉक दौऱ्याचं कारण ठरेना; भावाकडून वेगळाच दावा

ऋषिराज सावंत आणि त्यांचे बंधू गिरीराज सावंत या दोघांनी सांगितलेल्या चार्डर्ट विमानाच्या तिकीटाच्या किमतीतही तफावत असल्याचं दिसून आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक दौरा (Rishiraj Sawant Bangkok Tour) प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. आता ऋषिराज सावंत यांचं बंधू गिरीराज सावंत यांनी याबाबत खुलासा केला आहे. ऋषिराज सावंत दहा दिवसांपूर्वी दुबईला गेले होते. त्यांना व्यावसायिक कामासाठी बँकॉकला जायचं होतं. मात्र कुटुंबाकडून आक्षेप घेतला जाईल या भीतीने त्यांनी कुणालाच काही सांगितलं नाही असा दावा ऋषिराज सावंत यांचे बंधू गिरीराज सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे ऋषिराज सावंत यांनी मात्र बँकॉकमध्ये मित्राची सासुरवाडी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे दोन्ही दाव्यात तफावत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे तानाजी सावंत यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऋषिराज सावंतच्या नोंदवलेल्या जबाबातील माहितीनुसार, मित्राची सासरवाडी बँकॉकमध्ये असल्याने तेथे जाण्याचा प्लान केला. मात्र दुसरीकडे ऋषिराज सावंत यांचे बंधू गिरीराज सावंत यांनी ते व्यावसायिक कामांसाठी जात असल्याचा दावा केला आहे. ऋषिराजने विमान कंपनीला 68 लाख नव्हे 78 लाख मोजले होते.  बजाज एव्हिएशन कंपनीचे 'फॉलकोन 2000 एलएक्स ' या चार्टर्ड विमानाने ऋषिराज दोन मित्रांसह बँकॉकच्या दिशेने निघाले होते. ऋषिराजने या कंपनीला जीएसटी व इतर करांसह 78 लाख रुपये दिले होते. 

नक्की वाचा - Tanaji Sawant Son : ऋषिराज सावंतला बँकॉकला घेऊन जाणारं ते खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं? पुण्यातील ऑफिस गायब? 

पुणे ते बँकॉक विमानाचं तिकीट 15 ते 20 हजारादरम्यान आहे. येणं-जाणं गृहित धरलं तरी हा खर्च  50 हजारांपर्यंत जातो. पण हे चार्टर्ड प्लेन असल्याने 78 लाख मोजावे लागले. ऋषिराजने एक दिवस आधी आधारकार्ड, पासपोर्ट, व्हिसा कंपनीला दिले होते. एका मित्राची बँकॉकमध्ये सासुरवाडी असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आलं होतं. ऋषिराज यांनी फक्त जाण्याचं बुकिंग केलं होते. त्यामुळे या तिघांना बँकॉकमध्ये सोडून विमान परतणार होतं. जर हे तिघे काही दिवसांनी दुसऱ्या चार्टर्डने आले असते तर त्यांना अजून 78 लाख खर्च आला असता. म्हणजे एकूण प्रवासाचा खर्च दीड कोटींवर गेला असता.