Tuljapur News :महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुळजापूर येथील दोन प्रमुख बसस्थानकांना आता ऐतिहासिक नावे देण्यात आली आहेत. मुख्य बसस्थानकाला 'श्री तुळजाभवानी बसस्थानक' आणि दुसऱ्याला 'छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक' असे नाव देण्यात आले आहे.
या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी यांच्या श्रमाला उत्साहाची नवी उर्जा मिळावी म्हणून यंदा 50 नव्या बसेसची भर घालण्यात आती आहे. या बसेस खास भक्तांच्या प्रवासासाठी तुळजापूर मार्गावर धावणार असून, भाविकांना सुखरूप आणि सोयीस्कर प्रवासाची हमी देणार आहेत.
( नक्की वाचा : Navratri 2025: नवरात्रीसाठी मोफत स्टिकर्स हवेत? Gemini, ChatGPT नं 5 मिनिटात बनवा, वाचा 10 सोपे प्रॉम्प्ट्स )
इतकेच नव्हे तर, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल 1100 बससेवा सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी ही सोय म्हणजे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
एसटी महामंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी उचललेले हे पाऊल हे फक्त सोयीपुरते नाही, तर ती आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठीची नवी वाहतूक यज्ञसेवा ठरणार आहे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर व भाविक प्रवाशांवर सदैव राहो, अशी भावना देखील सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.