कोकण आणि पुण्याला जोडणारा म्हणून वरंध घाटाची ओळख आहे. महाड वरून भोर मार्गे या घाटातून पुणे गाठता येते. अनेक जण या घाटाचा अवलंब करतात. मात्र हा घाट आता 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. त्याची अधिसुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे. हा घाट बंद असल्याने पुण्याला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
19 जून ला जोरदार पाऊस झाला होता. या पावसात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली होती. शिवाय यामुळे रस्ताही खचला होता. त्यामुळे या ठिकाणी रस्ता हा वाहतुकीसाठी अरुंद आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळेच हा घाट आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील रायगड जिल्हा हद्दीत वरंध घाट 21 कि.मी.लांबीचा आहे. या घाटात अवघड वळणे आहेत. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. यामुळे जिवीत व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे आता खबरदारी घेतली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग
ही वाहतूक पुर्ण पणे बंद करण्यात आली नाही.पुण्याहून महाडकडे येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. छोटी वाहने पुण्याहून महाडकडे या मार्गे येवू शकतात. मात्र महाडहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुण्याला जायचे असेल तर ताम्हाणी घाटाचा पर्याय प्रवाशांसमोर ठेवण्यात आला आहे.