मनोज सातवी
वसई तालुक्यातील पहिलं 111 वर्षाचा समृद्ध इतिहास असलेल्या आगाशी वाचनालयात 18 व्या शतकापासूनच्या दुर्मीळ मराठी पुस्तकांचे प्रदर्शन सुरू आहे. या वाचनालयात मराठी साहित्य जगतातील गेल्या दीडशे वर्षांतील दर्जेदार, दुर्मिळ आणि ऐतिहासिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात 1870 सालापासून ते स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध लेखकांच्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे. अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक पुस्तके असलेलं हे आगाशी वाचनालय वाचक प्रेमींसाठी एक खजिनाच म्हणावं लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
शहरीकरणाच्या रेट्यात गावपण टिकवून असलेल्या आगाशी गावातील सार्वजनिक वाचनालयाच्या 'सरस्वती भुवन' या इमारतीत दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आगाशी सार्वजनिक वाचनालय हे 1914 साली गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला आहे. 111 वर्षाचा समृद्ध इतिहास असून हे वसई तालुक्यातील पहिलेच वाचनालय आहे. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने येथील अमूल्य पुस्तकांचा खजिना वाचकांना पाहता येणार आहे. यातमध्ये गो. वा. टोकेकर ह्यांचे 'भारतीय राज्यशास्त्र (1870), महाराज सयाजीराव गायकवाड लिखित 'देवाचे स्वभाव व सामर्थ्य' (1894) पहिल्या गद्य लेखिकांपैकी एक असलेल्या गिरीजाबाई केळकर ह्यांचे 'पुरुषांचे बंड' (1913), श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे संगीत वीरतनय नाटक (1916) कृष्णाजी खाडिलकरांच 'संगीत द्रौपदी' (1920), वा. गो. आपटे ह्यांचे 'सौंदर्य आणि ललितकला' (1921), स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1928 साली प्रकशित झालेले 'हिंदूपदपादशाही', तसेच संगीत नाटकांची दुर्मिळ पुस्तके सुद्धा या प्रदर्शनात पाहायला मिळतात.
ट्रेंडिंग बातमी - Political news:'सरकारने आम्हाला माती खायला लावू नये' मुनगंटीवारांचे सुर का बदलले?
ज्यात प्रसिद्ध नाटककार गो.ब. देवल यांच्या 'संगीत संशयकल्लोळ' यासह इतरही पुस्तकांचा समावेश आहे. त्या काळातील आरसा म्हणता येईल अशी पुस्तके जपून ठेवली आहेत. तब्बल 25 हजार 600 इतकी पुस्तकं या वाचनालयात आहेत.या प्रदर्शनात 'चित्रमय जगत' या महाराष्ट्रातील प्रसिद्ध मासिकाचे काही मूळ अंक ही ठेवण्यात आले आहेत. 'चित्रमय जगत' हे मासिक पुण्याच्या चित्रशाळा छापखान्याने 1910 साली सुरू केले होते. या मासिकाचे स्वातंत्र्यपूर्व काळातील मूळ अंक पाहताना त्यावेळच्या समाज जीवनाची कल्पना करता येते. चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मासिकात त्यावेळची चित्रे, जाहिराती आणि छायाचित्रे ही यात पाहता येतात. हे अंक पाहण्याची संधी या निमित्ताने वाचकांना उपलब्ध झाली आहे.
वाचनालयाकडे अनेक दुर्मिळ ग्रंथाचा संग्रह असून यात अनेक ऐतिहासिक ग्रंथाचा विशेष संग्रह आहे. 'वाचकांना जुन्या समृद्ध साहित्याची ओळख व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिडशे वर्षांच्या काळातल्या ह्या अनमोल ठेव्याचा आनंद लुटण्यासाठी वाचकांनी ह्या प्रदर्शनाचा जरूर भेट द्यावी.' असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष सारंग लेले यांनी केले आहे. या वाचनालयात असलेल्या ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन व्हावं जेणेकरून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेता येईल त्यासाठी शासनाने देखील मदत करावी अशी मागणी वाचनालयाचे कार्यवाह पुरंदरे यांनी केली आहे.
आगाशी वाचनालय हे सध्या तरुण पिढी चालवत असल्याबाबत या वाचनालयाच्या वाचक असलेल्या नीलम कल्पक चुरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या विरारच्या अण्णासाहेब वर्तक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सर्वसामान्य मुलांना पुस्तकं विकत घेता येत नाहीत, अशावेळी या वाचनालयाकडून मुलांना शंभर वर्ष जुन्या पासून ते आत्ताच्या नवीन पुस्तकांपर्यंतची सर्व पुस्तके उपलब्ध केली जातात याबाबत वाचनालयाचा त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. त्यामुळे वाचनाची आवड असलेल्यानी या वाचनालयाला नक्की भेट द्यावी.