काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अकोल्यात कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगावात पोहोचले असता यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांनतर चिखलातून जात असताना पाय भरलेले असल्याने विजय गुरव या कार्यकर्त्याने त्यांच्या पायावर पाकी टाकले. हा व्हिडीओ माध्यमांवर व्हायरल झाला. पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावले अशी टिका झाली. विरोधकांकडून पाटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व गोंधळ सुरू असताना पाय धुणारा कार्यकर्ता मात्र नॉट रिचेबल होता. मात्र आता हा कार्यकर्त्या समोर आला आहे. त्याने आपली पहिली थेट प्रतिक्रीया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रीये नंतर विरोधक काय बोणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्या दिवशी नक्की काय घडलं?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सोमवारी अकोला बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नियोजित कार्यक्रम होता. त्याच वेळेस शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी ही वाडेगावात मुक्कामी होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी पटोले हे चिखलातून त्या ठिकाणी पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर ते परतत जात असताना त्यांचे पाय चिखलाने माखले होते. त्यावेळी पाय धुण्यासाठी त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे? असा प्रश्न नाना पटोलेंचे पाय धुणाऱ्या विजय गुरव याने केला आहे. पटोले हे माझ्या वडिलांसमान आहेत. ते माझे दैवत आहेत. मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन. असे म्हणत त्यांनी विरोधकांचाही चांगला समाचार घेतला आहे.
ट्रेंडिंग न्यूज - मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, IMDकडून यलो अलर्ट
विरोधकांना इशारा
या प्रकरणानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. त्यात आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट, आमदार राम कदम, चित्रा वाघ हे आघाडीवर होते. या सर्वांचा समाचार गुरव याने घेतला आहे. नाना पटोले यांच्यावर केले जाणारे आरोप त्यांनी तातडीने थांबवावेत. स्वत: ची राजकीय पोळी तुम्ही माझे नाव वापरून भाजू नये. असे आवाहन ही त्यांनी केले. पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावाचा आहे. विजय गुरव असे त्याचे नाव असून तो काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात पटोले आले की हा कार्यकर्ता आवर्जून त्यांच्या सेवेत असतो.
विरोधकांचा आरोप काय?
नाना पटोले यांचे पाय धुण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर नाना यांच्यावर जोरदार टिकेची झोड उठली. नाना तुम्ही संत झालात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. लोकसभेत जास्त जागा काय जिंकल्या नाना हवेतून खाली यायला तयार नाही अशीही टिका झाली. शिवाय नेता हा कार्यकर्त्यांमुळे घड असतो. अशा वेळी कार्यकर्त्याला पाय धुवायला सांगणे या गोष्टीचा धिक्कार करतो अशा शब्दात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पटोले यांच्यावर टिका केली होती.