पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी म्हणजेच पवार फॅमिलीमध्ये लवकरच लग्नाचा बार उडणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचे लग्न जमले असून लवकरच त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. जय पवार यांच्या आत्या म्हणजेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीच सोशल मीडियावरुन ही गूडन्यूज दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकांची धामधुम संपल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फॅमिलीमध्ये शाही विवाह सोहळ्याची लगबग सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ऋतुजा पाटील असं अजित पवार यांच्या होणाऱ्या सूनबाईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा 10 एप्रिल रोजी पुण्यामध्ये पार पडणार आहे. या साखरपुड्याच्या सोहळ्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांचे त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
ट्रेंडिंग बातमी - Abu Azmi News: 'नमाजसाठी बाहेर पडा, अंगावर रंग टाकला तर...' अबू आझमींचे थेट आवाहन
कोण आहे ऋतुजा पाटील?
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार फॅमिलीच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सूनबाई आहेत.
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांना राजकारणात जास्त रस नसून ते व्यवसाय क्षेत्रात काम करतात. काही वर्ष त्यांनी दुबईमध्ये व्यवसाय केला, त्यानंतर आता ते बारामतीमध्येच व्यवसाय सांभाळतात. अलिकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर तेसुद्धा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.