अमोल गवंडे, पाटील बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नेमके कोण? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पडला आहे. कारण बदली झालेल्या पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी वैद्यकीय रजेवर होतो हजर झालो असे म्हणत पुन्हा एकदा खुर्चीचा ताबा मिळवला आहे. या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची 22 मे रोजी बदली झाली होती. त्यांना अमरावती येथे राज्य राखीव पोलिस दलाचे समदेशक पदी नियुक्ती देण्यात आली. आणि त्यांच्या जागी नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे निलेश तांबे यांची बुलढाणा जिल्हा अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.
निलेश तांबे यांनी तात्काळ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार ही स्वीकारला मात्र त्यानंतर विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये धाव घेत कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच आपली बदली करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे कॅटकडून 9 जून पर्यंत बदलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी साडेसात वाजताच विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन खुर्चीचा ताबा घेतला.
त्यानंतर नवीन रुजू झालेले पोलिस अधीक्षक निलेश तांबे हे देखील कार्यालयात दाखल झाले आहेत. सध्या ते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनात बसलेले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण याबाबतीत मोठा पेच कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सध्या माध्यमांसमोर कोणीही बोलायला तयार नाही. तर वैद्यकीय रजेवर होतो आणि आज हजर झालो असे तोंडी दोन शब्दात बदली झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले आहे.