Raja Shivaji चित्रपटाने उलगडले इतिहासातील विसरलेले पान; कोण होते शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे?

Who was Sambhaji Raje? : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट एका खास कारणासाठी प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय.

जाहिरात
Read Time: 3 mins
Who was Sambhaji Raje? : राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चननं संभाजीराजेंची भूमिका साकरली आहे.
मुंबई:

Who was Sambhaji Raje? : अभिनेता रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट एका खास कारणासाठी प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय, ते म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांच्यासोबतचे त्यांचे नाते. 

आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती आहे, परंतु शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नव्हती. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने ही भूमिका साकारली असून, यामुळे आता शिवरायांच्या या थोरल्या भावाचा पराक्रम पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

Advertisement

सह्याद्रीत शिवराय तर दक्षिणेत संभाजीराजांचा दरारा

मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. जेव्हा शिवनेरीवर राजमाता जिजाऊंच्या संस्कारात बाल शिवाजी स्वराज्याचे स्वप्न पाहत होते, त्याच काळात त्यांचे मोठे भाऊ संभाजीराजे भोसले हे वडील शहाजीराजांसोबत दक्षिण भारताची सूत्रे सांभाळत होते. 

साधारणपणे 1623 मध्ये जन्मलेले संभाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे बालपण आणि तारुण्य हे प्रत्यक्ष युद्धभूमीवर आणि लष्करी मोहिमांमध्ये गेले. शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी निजामशाही आणि आदिलशाहीतील अनेक गुंतागुंतीची युद्धे अनुभवली होती.

( नक्की वाचा : Raja Shivaji :'राजा शिवाजी' चित्रपट कसा आहे? रितेश देशमुख आणि संजय दत्तची पडद्यावर टक्कर;वाचा सविस्तर )

अफजलखानचा विश्वासघात

संभाजीराजे हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते गनिमी कावा आणि मैदानी युद्धात अत्यंत निपुण होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि वेदनादायी वळण म्हणजे 1654 मधील कनकगिरीची लढाई. कनकगिरीचा किल्ला जिंकण्यासाठी गेलेल्या संभाजीराजांचा सामना अफजल खानाशी झाला. 

इतिहासकारांच्या मते, अफजल खानाने या युद्धात अत्यंत कुटिल राजकारण केले. त्याने जाणीवपूर्वक रसद पुरवण्यास उशीर केला आणि कपटाने केलेल्या हल्ल्यात संभाजीराजे जखमी झाले. याच युद्धात लढताना या पराक्रमी मराठा योद्ध्याला वीरमरण आले. एका धाडसी नेतृत्वाचा असा शेवट होणे ही भोसले घराण्यासाठी आणि भविष्यातील स्वराज्यासाठी मोठी हानी होती.

Advertisement

( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )

भावाच्या हत्येचा सूड आणि प्रतापगडाचा रणसंग्राम

आपल्या थोरल्या भावाच्या निधनाचा धक्का शिवरायांना आणि जिजाऊंना प्रचंड मोठा होता. विशेषतः अफजल खानाने केलेल्या विश्वासघाताची सल शिवरायांच्या मनात कायम होती. अनेक इतिहासकारांच्या मते, 1659 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तो केवळ स्वराज्यावरील संकटाचा अंत नव्हता. तो आपल्या थोरल्या भावाच्या, संभाजीराजांच्या हत्येचा घेतलेला एक ऐतिहासिक सूड होता. भावाच्या बलिदानाचा प्रतिशोध घेऊन शिवरायांनी शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले होते.

आजही जपल्या आहेत स्मृती

संभाजीराजे हे एक कुशल प्रशासक आणि शत्रूवर जरब बसवणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्यानंतर जिजाऊ आणि शिवरायांनी परकीय आक्रमकांविरुद्धचा लढा अधिक तीव्र केला. आजही कर्नाटक राज्यातील चन्नगिरी तालुक्यातील होदिगेरे या ठिकाणी शहाजीराजांच्या समाधीजवळ संभाजीराजांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. 

Advertisement

राजा शिवाजी या चित्रपटाच्या निमित्ताने हा विस्मृतीत गेलेला इतिहास आणि दोन भावांमधील अतुट प्रेम पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर सोप्या भाषेत उलगडले जात आहे.