गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?

जाहिरात
Read Time: 3 mins
वर्धा:

वर्धा जिल्ह्यातील अशी काही गावं आहेत तिथून लोक गाव सोडून जात आहेत.  आष्टी तालुक्यातील ही जवळपास 9 गावं आहेत. त्यात थार, चामला, किन्ही, बामरड़ा, बोरखेडी, बोटोना, मोइ, मुबारकपूर व ठेकाकोल्हा यांचा समावेश आहे. गावातून लोक स्थलांतर करत असल्यामुळे गावच्या गावं ओस पडल्याचं चित्र आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच गावकरी आता गावात आहेत. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात ही गावं रिकामी होतात. त्या मागचं कारणंही तेवढचं गंभीर आहे. 

गावकरी का सोडत आहेत गाव? 
या 9 गावांची लोकसंख्या जवळपास १० हजाराच्या घरात आहे. मार्च एप्रिल महिना आला की यागावात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होते. पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावातला प्रत्येक माणूस पाण्यासाठी रात्री बे रात्रीही दोनदोन तीनतीन किलोमीटर जातो. जनावारांच्या पाण्याचा प्रश्न तर आणखी गंभीर आहे. त्यांच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर पर्यंत जावं लागतं. त्यात संपुर्ण गाव हे शेतीवर अवलंबू आहे. अशा स्थितीत पाणी नाही, हाताला काम नाही. पाणी नसल्यामुळे शेतीची कामं ही ठप्प यामुळे यागावतली लोक गाव सोडून शहराकडे जातात. याकाळात गावच्या गाव ओस पडलेली असतात. 

गावात पाण्याचा प्रश्न गंभीर

गावकऱ्यांच्या नशिबी नेहमीच भटकंती 
या भागात जुलै ते डिसेंबर शेतीसाठी पाणी वापरायला मिळते. त्यात चार महिने पावसाळा असतो. या भागातील नद्या, नाले, विहिरी डिसेंबर जानेवारी महिन्यात कोरड्या पडतात. एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्या पासूनच सर्व नद्या नाले पूर्णतः कोरडे झाले आहेत. एप्रिल महिना ते पाऊस पडे पर्यंत जनावरांना घेऊन चाऱ्याच्या व पाण्याच्या शोधात, पशुपालकाना भटकंती करावी लागते. आपले गाव व कुटुंब सोडून तीन ते चार महिने बाहेर काढावे लागते. या भागातील नागरिकांची सामाजिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, आर्थिक स्थिती तसेच जीवनमान यामुळे पुर्ण पणे ढासळलेले आहे.

प्रशासन कधी लक्ष देणार?
अशा स्थितीमुळे जगायचं कसं असा प्रश्न या गावकऱ्यांपुढे असतो. कुटुंबातील मुलामुलींचे  शिक्षण, लग्न, आरोग्य सुविधा हा पण चिंतेचा विषय बनला आहे. कुटुंबाच्या आवश्यक गरजाही पूर्ण होवू शकत नाही. या भागात शेतीसाठी लागणार्‍या आवश्यक सुविधा आजही उपलब्ध नाही. शेती सिंचनासाठी पाणी नाही, गावांना जोडणारा रस्ता नाही, तालुक्याला जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था आहे, विद्यार्थ्यांना बस सुविधा वेळेवर नाही, पिण्यासाठी स्वच्छ पानी नाही, शेतीला रस्ते नाही, जंगली जनावरांचा नाहक त्रास शेतकरी वर्गाला होत आहे. पावसाळ्यात नदीला पूर येणे यावर काहीही नियंत्रण नाही. शासनाचे, सरकारचे राजकिय नेत्यांचे काहीही लक्ष या भागाकडे नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे. 

Advertisement

तरूणांचा ओढा शहराकडे 
गावात काहीच नसल्यामुळे तरूण वर्गही गाव सोडून रोजगारासाठी शहराची वाट धरत आहे. जे काम मिळेल ते तो करत आहे. मोलमजूरी करून पदरात जे पडेल ते घेणे अशीच भावना यागावातल्या तरूणांची झाली आहे. दरवर्षी प्रत्येक गावातील आठ ते कुटुंब गाव सोडून कामाच्या शोधात बाहेर जात आहे. आठ ते दहा वर्षात पूर्ण गावे ओसाड पडतील अशी स्थिती आहे.