Beed Tembhe Ganpati : गणेश चतुर्थीनंतर सात दिवसांनी का होते टेंबे गणपतीची स्थापना? वाचा इतिहास

गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं सर्वत्र आगमन झालं आहे. पण, माजलगावच्या टेंबे गणपतीची स्थापना गणेश चतुर्थीनंतर सात दिवसांनी केली जाते. 

Advertisement
Read Time: 2 mins
माजलगाव, बीड:

स्वानंद पटील, प्रतिनिधी

गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं सर्वत्र आगमन झालं आहे. काही जणांनी त्यांच्या प्रथेनुसार दीड दिवसांच्या, पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जनही केलं आहे. राज्यात सर्वत्र गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसंच पोलिसांची विसर्जन मिरवणुकीची तयारी देखील सुरु झाली आहे. या सर्व घटनांमध्ये बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधला टेंबे गणपती वेगळा आहे. टेंबे गणपतीची स्थापना यंदा शनिवारी (14 सप्टेंबर) रोजी होणार आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. माजलगावच्या टेंबे गणपतीची स्थापना गणेश चतुर्थीनंतर सात दिवसांनी केली जाते. 

गणेश चतुर्थीनंतर सात दिवसांनी बाप्पाची स्थापना करण्याची ही परंपरा गेल्या 123 वर्षांपासून सुरु आहे. राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना भाद्रपद एकदाशीला होण्याचं खास कारण आहे. 1901 साली ही प्रथा सुरु झाली. त्यानंतर गेल्या 123 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण ? 

बीड जिल्ह्यातील माजलगाव हे स्वातंत्र्यपूर्व काळात निजामशाहीचा भाग होते. 1901 साली टेंबे गणपतीची प्रतिष्ठापना झाली. पण, मिरवणुकीला परवानगी नाकारल्यात आली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबादला जाऊन परवानगी मिळवली. त्या काळात रेल्वे किंवा अन्य वाहनांची सोय नसल्यानं मंडळाचे अधिकारी घोड्यावर हैदराबादला गेले. त्यामुळे त्यांना या सर्व कामासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला.

पाच दिवसानंतर गणपतीची मिरवणूक जिथं थांबवण्यात आली होती, तिथूनच ती पुढं नेण्यात आली. तेव्हापासून टेंबे गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीच्या दिवशी होते. तर, विसर्जन पाच दिवसांनी पौर्णिमेला होते. 

या गणपतीची मूर्ती माती,शेण,चिखल,गोमूत्र, दुध,सारवणाच्या मिश्रणातून साकारली जाते. त्याची उंची 7 फूट असते. पूर्वापार सुरु असलेली ही इकोफ्रेंडली गणपतीची परंपरा आजही कायम आहे. 

( नक्की वाचा : पुणेकरांनो, वाजवा रे वाजवा..गणेशभक्तांसाठी सुप्रीम कोर्टानं रद्द केला बंदीचा 'तो' आदेश )
 

 का पडले  टेंबे गणेश नाव?

निजामकाळात विजेची सोय नसल्याने गणपती विसर्जन मिरणुकीत प्रकाश असावा म्हणून भाविक आगीचे टेंबे धरत असत. ही परंपरा आजही कायम आहे. आजही अनेकजण टेंबे घेऊन या मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे मंडळाला टेंबे गणपती हे नाव पडले आहे. मंडळाकडून यावर्षीही पाच दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी दिली. 

Topics mentioned in this article