Pawanraje Nimbalkar Murder Case: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मुंबईतील विशेष न्यायालयात निकाल जाहीर झाला आहे. या बहुचर्चित प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पद्मसिंह पाटील यांना खूप मोठा दिलासा मिळाला असला, तरी या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र नवीन चर्चांना उधाण आले आहे.
ओमराजे पुढे काय करणार?
पवनराजे निंबाळकर खटल्याच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार की नाही? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. खटल्याच्या निकालानंतर आपण शिंदे गटात जाण्याचा राजकीय निर्णय घेऊ, असे संकेत ओमराजे यांनी यापूर्वी दिले होते.
मात्र, आजचा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांना याविषयी विचारले, तेव्हा त्यांनी आपण शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी आणि सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतरच पुढील दिशा ठरवेन, असे त्यांनी सांगितले. तसेच या खटल्याच्या निकालाचा आणि माझ्या राजकीय निर्णयाचा कोणताही थेट संबंध नाही, असे म्हणत सध्या कलियुग सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
( नक्की वाचा : Eknath Shinde: तुम्ही आम्हाला काय तुडवणार? हिंमत असेल तर...'ऑपरेशन तुडवा'वर शिंदेंचे ओपन चॅलेंज )
ऑपरेशन टायगरला धक्का बसणार?
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ते शिंदे गटात जाणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स आता अधिकच वाढला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले होते. पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचायचे असेल, तर त्यापैकी किमान 6 खासदारांनी एकत्र येऊन गट बदलणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका बदलली, तर शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांची संख्या 5 वर येऊ शकते. अशा परिस्थितीत तांत्रिक अडचणींमुळे ते सर्व 5 खासदार अपात्र ठरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे सत्ताधारी गटाचे ऑपरेशन टायगर अपयशी ठरू शकते. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर आगामी काळात काय पाऊल उचलतात, यावरच या संपूर्ण राजकीय घडामोडींचे भवितव्य अवलंबून असणार आहे.