Davos 2025: दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या दिग्गजांच्या भेटी; PHOTO

दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत

जाहिरात
Read Time: 2 mins

Devendra Fadnavis Davos:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

यंदाच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्यालाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला. दावोस येथे साकारलेल्या इंडियन पॅव्हेलियनच्या उदघाटन समारंभाला सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या स्वागत समारंभालाही हे उपस्थित राहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम मध्यरात्रीनंतर होईल.

होरॅसिसच्या अध्यक्षांसोबत बैठक
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक सुद्धा आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.