Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्रौत्सवाची धूम
Navratri 2024: कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुर्गादेवीच्या साक्षीने कल्याणमधील खाडी किनारी किल्ले दुर्गाडी हा भुईकोट किल्ला उभारला. या किल्ल्यावरील देवीला दुर्गाडी देवी असे संबोधले जाते. कल्याणची खरी शिवकाली ओळखही किल्ले दुर्गाडीमुळेच आहे. किल्ले दुर्गाडीवर दरवर्षी नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जातो. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रौत्सवामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शामुळे या किल्ल्याला एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. कल्याण शहराला तटबंदी होती. 11 बुरुज आणि अनेक दरवाजे होते. 1654मध्ये आदिलशाहीच्या तावडीतून कल्याण, भिवंडी आणि सुरत ही ठाणी सोडवली गेली. दुर्गादेवीची कृपा झाल्याने या किल्ल्यास 'दुर्गाडी' असे नाव दिले गेले, असे म्हणतात. दुर्गाडी किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली. त्यावेळी खोदकाम करताना महाराजांना धन सापडले होते.
-
दुर्गाडी देवीच्या साक्षीने कल्याणच्या खाडी किनारी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सोबत घेऊन मराठा आरमाराची सुरुवात केली. पोर्तुगीजांच्या मदतीने जहाज बांधणीचे काम सुरू केले होते. कल्याण हे प्राचीन काळी प्रसिद्ध बंदर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले दुर्गाडी हा किल्ला बांधला. दुर्गाडी देवीच्या साक्षीने महाराजांनी स्वराज्याच्या मराठा आरमाराची सुरुवात केली. त्यामुळे इतिहासात किल्ले दुर्गाडीचे महत्त्व अद्वितीय आहे.
-
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्थापन केलेली दुर्गाडी देवीची मूर्ती तत्कालीन नगराध्यक्ष ना.का. आहेर यांनी केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यातील पितळी मूर्तीच्या शेजारीच देवीचा तांदळा आहे. देवीची खरी जागा ती आहे. दुर्गाडी किल्ल्याला प्रवेशद्वार आहे. समोरच गणेशाची मूर्ती असल्याने त्यास 'गणेशद्वार' असे संबोधले जाते.
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1968मध्ये सपत्निक दुर्गाडी देवीच्या मंदिरामध्ये पूजा बांधली होती. त्यावेळी पोलिसांचा बंदी आदेश असताना हा आदेश झुगारून ही पूजा बांधली होती. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 40 वर्षापूर्वी बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन आजही केले जाते.
-
किल्ला आणि मंदिर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे किल्ल्याची दुरुस्ती, देखभाल करायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. सध्या या किल्ल्यावर डागडुजीची कामे सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.