जाहिरात

Shrimant Bajirao Peshwa: श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थळाचे Exclusive Photos

Shrimant Bajirao Peshwa Birth Place: हिंदवी स्वराज्याच्या झेंडा अटकेपार रोवणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा इतिहास सर्वांनाच परिचित आहे. हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या या अजिंक्य योद्ध्याच्या जन्मस्थळाबाबतची माहिती जाणून घेऊया...

  • श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे सिन्नर तालुक्यातील जन्मस्थान डुबेरे येथील बर्वे वाड्याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
  • डुबेरे गाव आणि येथील बर्वे घराण्याचा इतिहास मोठा रंजक आहे. सिन्नरपासून दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर असणारे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे.
  • बाजीरावांचे मामा सरदार मल्हारराव बर्वे आणि आई राधाबाई बर्वे हे भाऊबहीण. बर्वे यांचे मूळ गाव कोकणातील गणपतीपुळे जवळील नेवरे हे होय. बाळाजी विश्वनाथ भट यांचे मूळ गाव श्रीवर्धन. बाळाजींचे वडील छत्रपती शिवरायांच्या चाकरीत होते. राधाबाई बर्वे आणि बाळाजी विश्वनाथ भट यांचा विवाह कोकणातच झाला.
  • सासवड निवासी बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांचे प्रथम संतान म्हणजे प्रताप बाजीराव. हिंदू रुढी परंपरांप्रमाणे स्त्रीचे पहिले बाळंतपण माहेरी होते. पण पावसाळ्याचे दिवस, दूरचा प्रवास आणि राजकीय अस्थिर परिस्थितीमुळे कोकणऐवजी जवळचे आणि सुरक्षित ठिकाण म्हणून मामाचे गाव डुबेरे हे बाळंतपणासाठी निश्चित केले.
  • 18 ऑगस्ट 1700 भाद्रपद पौर्णिमा या दिवशी डुबेरे येथील बर्वे वाड्यात बाजीराव यांचा जन्म झाला. बाजीरावांची मुंज त्र्यंबकेश्वर येथे झाल्याचे दस्तावेज सापडले आहेत.
  • मल्हारराव बर्वे यांनी वसवलेल्या डुबेरे गावाची रचना सुनियोजित आहे. गावाला पूर्वी भक्कम तटबंदी होती. गावामध्ये प्रवेशासाठी उत्तर आणि दक्षिणेला दोन वेशी आहेत. पेशव्यांचे जन्मस्थान असलेला बर्वे वाडा गावाच्या मध्यभागी आहे.
  • गावातील गल्ल्याबोळ काटकोनात आहेत. दीड एकर क्षेत्रामध्ये असलेला बर्वेवाडा तीन मजली, भक्कम भुईकोट किल्ल्यासारखा आहे. वाड्याला तटबंदी, बुरुज, पूर्व पश्चिम असे दोन भव्य दरवाजे आहेत.
  • वाड्यात कचेरी, माजघर, दिवाणखाना, पाण्यासाठी आड, धान्य बळद, देवघर सुस्थितीत आहे. पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ढाल, तलवार, चिलखत, भाला, बंदूक, चवऱ्या इत्यादी वस्तू आहेत. पेशव्यांची प्रतिमा असलेली जन्मखोली उन्हाळ्यात थंडगार आणि हिवाळ्यात उबदार अशी नैसर्गिक वातानुकूलित तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
  • पश्चिम दरवाजावर नगारखाना, रखवालदाराची देवडी आहे. वाड्याला तीन चौक आहेत. वाड्याचे बांधकाम चिरेबंदी असून सागवानी लाकडामध्ये इमारतीचा सांगाडा तयार केलेला आहे. लाकडावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
  • वाड्याच्या रुंद भिंती, त्यातील जिने, खेळती हवा, प्रकाशासाठी झरोके, पागा, धान्य कोठारे पाहण्यासारखी आहेत. बुरुजावरून गावाचा पूर्ण परिसर दिसतो. नुकतेच वाड्याच्या मधल्या चौकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पाच फुटी अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा दिमाखात बसवण्यात आला आहे.
  • वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून अश्वविद्या, तलवार, भालाफेक यात तरबेज असलेल्या बाजीरावांनी लढाई आणि राजकारणाचे धडे आपल्या वडिलांबरोबर होणाऱ्या मोहिमांमधून गिरवले. बाजीरावांना माणसांची उत्तम पारख होती.
  • वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर मुघल सत्तेच्या "मुळावरच घाव घाला, फांद्या आपोआप खाली येतील" असे धोरण अवलंबत त्यांनी मराठी स्वराज्य मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इत्यादी प्रदेशांपर्यंत वाढवत त्याचे साम्राज्यात रुपांतर केले.
  • अवघ्या 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 41 लढाया केल्या आणि सर्व ठिकाणी विजय मिळवत अजिंक्य योद्धा म्हणून नावलौकिक मिळवला. निजामाबरोबरच्या पालखेडच्या लढाईचा आजही गौरवाने उल्लेख केला जातो. इंग्लंड, अमेरिकेच्या युद्धशास्त्रात त्यांचे धडे शिकवले जातात.
  • वेगवान हालचाली, मैदानावरील गनिमी कावा आणि शत्रूला गाफील ठेवणे ही बाजीरावांची आधुनिक रणनीती होती. एका दिवसात 60 ते 70 किलोमीटर घोडदौड हा त्या काळातील त्यांच्या सैन्याचा सर्वोत्तम वेग होता. साम्राज्य रक्षणासाठी अठरापगड जातीतील शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, बुंदेले यांची उत्तम फळी त्यांनी निर्माण केली.
  • निजामाचे पारिपत्य, राजा छत्रसालाला मदत, मातोश्री राधाबाईंची शत्रू मुलखातील काशीयात्रा, पुण्यामध्ये भव्य शनिवार वाडा बांधणे, मस्तानी भेट हे बाजीरावांच्या जीवनातील प्रमुख पैलू.
  • बाजीराव यांना जास्त आयुष्य मिळाले असते तर कदाचित आपला इतिहास वेगळा असता.
  • आयुष्यभर अखंड घोडदौड करणाऱ्या, सर्वसामान्य सैनिकांमध्ये त्यांच्याप्रमाणेच राहणाऱ्या, प्रसंगी हातावर कणसे मळून मुलुखगिरी करणाऱ्या या शूर सेनानीचा अकाली मृत्यू मध्य प्रदेशातील नर्मदा काठावरील रावेरखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी झाला आणि एक तेजपुंज पर्व अनंतात विलीन झाले.
  • Photo Credit - Pranjal Kulkarni