Nana Patole big statement Akhand Congress: देशाच्या राजकारणात सध्या एका अत्यंत मोठ्या आणि दूरगामी राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. एकेकाळी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणारे दिग्गज नेते आता पुन्हा एकदा मूळ काँग्रेस पक्षात परतणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि देशातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर 'अखंड काँग्रेस' साकारण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबत राष्ट्रीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
काय आहे नाना पटोलेंचा मोठा दावा?
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा ही केवळ एक अफवा असल्याचे सांगत वृत्त फेटाळले असले, तरी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मात्र वेगळाच आणि खळबळजनक खुलासा केला आहे.
समविचारी पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी करत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि ममता बॅनर्जी हे काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी मानसिकदृष्ट्या तयार होत आहेत, असा थेट दावा पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ही केवळ सरकार स्थापनेसाठीचे किंवा निवडणुकीसाठीची आघाडी नसेल, तर ते थेट विलीनीकरण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत )
शरद पवारांचा प्रस्ताव आधीच तयार
नाना पटोले यांनी आपल्या दाव्यात पुढे म्हटले की, शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता, परंतु काही कारणांमुळे त्याला उशीर झाला. सध्या देशातील राजकारणात जे काही सुरू आहे ते पाहता, विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणावर होणारे विभाजन रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष आणि बहुसंख्याक विचारसरणीच्या सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.
राष्ट्रीय पातळीवर ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाली असून, ममता बॅनर्जी असो की शरद पवार, सर्वजण आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी दाखवत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
( नक्की वाचा : Sameer Bhujbal: भुजबळ नाराज असतानाच पुतण्याने उघड केले पडद्यामागचे सत्य; 'या' कारणामुळे हुकली मंत्रिपदाची संधी )
संजय राऊतांनी टाकली होती ठिणगी
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या संपूर्ण विषयाला तोंड फोडले होते. काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या छोट्या प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकदा मुख्य काँग्रेस पक्षात विलीन करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी केले होते.
काँग्रेस मजबूत असणे देशासाठी गरजेचे आहे आणि त्यातूनच बाहेर पडलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आताची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असे राऊत म्हणाले होते. यावर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा एक चांगला प्रस्ताव असल्याचे सांगत, आधी पाऊस पडू द्या, मग छत्री घ्यायची की रेनकोट ते ठरवू, असे सूचक आणि गूढ उत्तर दिले होते.
अशोक गेहलोतांचा गुगली
या राजकीय चर्चेमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनीही उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यात तथ्य असून आता तीच योग्य वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधून वेगळे होऊन प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या सर्व नेत्यांनी पुन्हा एकत्र यावे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व मनापासून स्वीकारावे, असे आवाहन गेहलोत यांनी केले.
संपूर्ण देशात 'इंडिया' आघाडीचे नेते केवळ राहुल गांधीच आहेत, असा स्पष्ट संदेश गेला पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी असे चित्र स्पष्ट झाल्यास देशातील मतदानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतिहास आणि वर्तमानातील साधर्म्य
ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोघांचाही काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा एक मोठा इतिहास आहे. ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती, तर शरद पवार यांनी 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर पीए संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता.
सध्या तृणमूल काँग्रेस ज्या अंतर्गत संकटाचा सामना करत आहे, तशाच संकटाचा सामना शरद पवार यांनी 2023 मध्ये केला होता. त्यावेळी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्या ताब्यात घेतले होते.
काँग्रेसची भूमिका काय?
या आठवड्यात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या लागोपाठच्या बैठकांमुळे या चर्चेला उधाण आले आहे. मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली, तर बुधवारी तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला एक मजबूत आघाडी हवी असून विरोधी पक्षांमध्ये राहुल गांधींचे नेतृत्व मान्य असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव असल्यास तो तृणमूल काँग्रेसकडूनच अधिकृतपणे आला पाहिजे, काँग्रेस स्वतःहून यासाठी पुढाकार घेणार नाही, असे काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.