Akola News: अकोल्यात एका समुदायाच्या 4,880 मतदारांचे स्थलांतर?, 'घर ड्रोननं उडवलं का?' आमदाराचा प्रश्न

Akola News : अकोला महानगरपालिकेतील प्रभाग रचनेमध्ये (Ward Delimitation) मोठे फेरबदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola News : ही खासगी व्यक्तींमार्फत हे स्थलांतर करण्यात आले असल्याचा आमदार पठाण यांचा दावा आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, अकोला महानगरपालिकेतील प्रभाग रचनेमध्ये (Ward Delimitation) मोठे फेरबदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला आहे. विशेषतः, एका विशिष्ट समुदायाच्या हजारो मतदारांचे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर (Voter Migration) करण्यात आले आहे. हा 'मुस्लीम मतदारांवर जाणीवपूर्वक केलेला अन्याय' आहे, असा थेट दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करत, तातडीने चुका दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आमदारांनी दिला आहे.

काय आहे आरोप?

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्यानंतर अकोल्याच्या मनपा प्रभाग रचनेत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी आरोप केला आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक 16, 18, 7, 1, 11 आणि 2 मधून प्रत्येकी सुमारे 2 ते 3 हजार मतदारांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

या कामासाठी बीएलओ (BLO) म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर यांचा वापर न करता, काही खासगी व्यक्तींमार्फत हे स्थलांतर करण्यात आले असल्याचा आमदार पठाण यांचा दावा आहे. 'एका प्रभागातील 4 हजार मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले असतील, तर ते नागरिक महापालिकेत इलेक्शन कार्ड (Election Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) घेऊन कसे येणार?', असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Akola News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; सायबर गुन्ह्यांमधील 'नागपूर मॉडेल' उद्ध्वस्त )
 

मनपा आयुक्तांकडे आमदारांची तक्रार

या गंभीर प्रश्नावर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आक्रमक झाली असून, आमदार साजिद खान पठाण आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आज मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने (Dr. Sunil Lahane) यांना लेखी निवेदन दिले.

Advertisement

आमदार पठाण यांनी यावेळी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक 7 मध्ये तब्बल 4,880 मुस्लिम मतदारांना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आले आहे, तर इतर समाजाच्या मतदारांना मात्र कोणताही 'स्पर्श' करण्यात आलेला नाही. हे स्थलांतर जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे, त्यामुळे हा मुस्लीम समाजावर केलेला 'अन्याय' आहे, असा दावा त्यांनी केला. ही चूक केवळ अकोल्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडल्याचे आयुक्तांनी मान्य केल्याचेही पठाण यांनी सांगितले.

'माझं मत चोरी झालं'  

"माझं घर तर ड्रोन लावून उडवून दुसऱ्या प्रभागात नाही ना नेलं?" असा उपरोधिक सवाल करत आमदार पठाण यांनी मनपा प्रशासनावर कठोर टीका केली.

ते म्हणाले, एका बाजूला नागरिकांना मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असे सांगितले जाते, पण दुसरीकडे मतदारांची चुकीची नोंद करून लोकशाहीच कमकुवत (Weakening Democracy) केली जात आहे. मनपा प्रशासनाने ही चूक तात्काळ दुरुस्त करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून 'माझं मत चोरी झालं' असा आवाज उठवतील, अशी चेतावणी आमदारांनी दिली आहे. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने तोडगा न काढल्यास, 'मतदान होणार की नाही हे जनता ठरवेल', असा स्पष्ट इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article