शिवसेना शिंदे गटाते आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. गणेश मंडळाचा कार्यक्रम आटपून बाहेर आल्यानंतर ते नागरिकां बरोबर हस्तांदोलन करत होते. त्याच वेळी एकाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला तिथेच तातडीने जेरबंद करण्यात आले. हा हल्लेखोर संगमनेरचाच असल्याची प्राथमिक माहीती आहे. हा हल्ला झाल्यानंतर ऐन गणेश उत्सव काळात संगमनेरमध्ये काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन अवघ्या महाराष्ट्रात ‘जायंट किलर' म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख आहे. शिवसेना शिंदे गटाचे ते संगमनेरचे आमदार आहेत. त्यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील हल्लेखोराला आमदार खताळ यांच्या सुरक्षारक्षकाने तत्काळ जेरबंद केले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरासह संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून ऐन गणेशोत्सवात पोलिसांची डोकेदुखी वाढल्याच दिसून येत आहे.
संगमनेर येथील एका गणेश मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल खताळ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना ते उपस्थित असलेल्या नागरिकांना हस्तांदोलन करीत असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या खांडगावच्या एकाने त्यांच्यावर हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुरक्षारक्षकाने तात्काळ हल्लेखोरावर झडप घातली. हा प्रकार पाहून आसपास उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनीही घटनास्थळावर धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.