खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. त्याची प्रचेती महाड इथं झालेल्या सभे वेळी आली. महाडमधील एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची हुबेहूब नक्कल केली. त्यामुळे भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत. या घटने नंतर भरत गोगावले यांची मुलगी शितल गोगावले -कदम यांनी सुनिल तटकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद रायगड जिल्ह्यात आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ठाकरे गटातून स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी सुनिल तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली. गोगावले हे नेहमी नॅपकीन वापरतात. नॅपकीन वापरतानाची त्यांची स्टाईल हुबेहुब तटकरे यांनी मारली. त्यामुळे सभे ठिकाणी एकच हशा पिकला होता. त्यांनी केलेली ही नक्कल गोगावले यांची कन्या शितल गोगावले यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी माध्यमांसमोर येत तटकरेंना जशाच तसे उत्तर दिले आहे.
त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, भरतशेठ यांच्या नॅपकिनची आतापर्यंत अनेकांनी थट्टा उडवली आहे. अनेकांनी तिचे कौतुकही केलं आहे. शेतकऱ्यांचा घाम पुसण्यासाठी सोबत ठेवलेल्या नॅपकीनमध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. टिश्यू पेपर वापरुन फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही. आपलं तोंड दुसऱ्यांच्या कपड्यांना पुसण्याची सवय नसल्यामुळे स्वत:च्या हिमतीवर भरतशेठ गोगावले यांनी महाडमध्ये साम्राज्य उभं केलं आहे असं ही त्या यावेळी म्हणाल्या.
मनाचा मोठेपणा आणि आपुलकी यामुळे महाडमधील लाखो मतदारांनी या नॅपकीन वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीला आपलं केलं आहे. ज्यांनी नॅपकीनचं कौतुक केलं ते आज गोगावलेंच्या मनात आहेत. ज्यांनी त्या नॅपकिनची थट्टा उडवली ते भरतशेठ यांना संपवण्याच्या नादात कधी संपून गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी पुन्हा नॅपकिनची थट्टा उडवली आहे, त्यांनी आता स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. असा इशारा ही या निमित्ताने शितल यांनी तटकरेंना दिला आहे.
महाडच्या चांदे मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची नक्कल केली, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे