मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेवून या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. इंडीया आघाडी विरुद्ध एनडीए असा थेट सामना बिहारमध्ये आहे. तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाने हा लढाई तिरंगी केली आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यासाठी ही निवडणूक होत आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी गेल्या दोन दिवसांत बिहारचा दौरा केला होता. त्यांनी यावेळी राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यानुसार ही निवडणूक अतिशय सुलभ होईल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तारखा घोषीत केल्याने बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये मतदारांची एकूण संख्या 7.43 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3.92 कोटी, महिला मतदारांची संख्या 3.50 कोटी आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या 1,725 आहे. विशेष म्हणजे, 18 ते 19 वयोगटातील 14.01 लाख युवक प्रथमच मतदान करणार आहेत. मतदारांची यादी 30 सप्टेंबर रोजी जाहीर झाली असून, उमेदवारी अर्जासाठीच्या तारखेच्या 10 दिवस आधी यादीतील त्रुटी सुधारण्याची संधी मतदारांना मिळणार आहे.
बिहार विधानसभेसाठी कांटे की टक्कर आहे. नितीश कुमार जवळपास वीस वर्षे बिहारचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या समोर आरजेडीच्या तेजस्वी यादव यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. तर वोट बचाव यात्रेने काँग्रेसच्या राहुल गांधी यांना माहोल निर्माण केला आहे. तर नितीश कुमार आणि भाजप सरकारने महिलांच्या खात्यात दहा हजार जमा करून मोठी राजकीय खेळी केली आहे. अशा स्थितीत प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहार पिंजून काढला आहे. त्यामुळे इथली निवडणूक ही अटीतटीची झाली आहे. त्यामुळे यावेळी सत्ता बदल होणार की नितीश कुमार सत्ता राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.