राजकारणातून सहजासहजी कुणी निवृत्त होत नाही. सत्तेचा मोह तसा कुणालाही सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे अनेक वर्ष एकच चेहरा आपल्याला राजकारणात दिसतो. काही जण निवृत्त तर होतात पण पडद्या मागे सर्व सुत्र स्वत:च हलवतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना संधी देतात हा राजकारणातील आतापर्यंतचा प्रत्येकालाच आलेला अनुभव आहे. आता भाजपच्या राज्यातील एका जेष्ट नेत्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पण हे संकेत देताना त्यांनी शेवटची एक इच्छा ही व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची ही निवृत्ती म्हणायची की काय अशी चर्चा त्यांच्याच मतदार संघात सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपचे ते जेष्ट नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर. लोणीकरांनी परतूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व दिर्घ काळ केले आहे. त्यांनी या मतदार संघाचे जवळपास चाळीस वर्षे प्रतिनिधीत्व केले. आता आपण विधानसभा निवडणूक लढणार नाही. असं सांगत असताना त्यांनी आपली पुढची इच्छाही बोलून दाखवली, चाळीस वर्ष विधानसभा निवडणूक लढवली. आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पक्षाने जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढण्याची आपली इच्छा आहे असं लोणीकर म्हणाले.
बबनराव लोणीकरांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा परतूर हा विधानसभा मतदार संघ परभणी लोकसभा मतदार संघात येतो. हा मतदार संघ पारंपारीक शिवसेनेचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघावर शिवसेनेचे 1989 पासून एक अपवाद वगळता हा मतदार संघ नेहमीच शिवसेने बरोबर राहीला आहे. त्याच मतदार संघावर आता एक प्रकारे लोणीकर यांनी दावा केला आहे. ही जागा यावेळी महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आली होती. महादेव जानकर यांनी इथून निवडणूक लढवली होती.
परभणी लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव झाला. त्यामुळे पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोणीकरांनी आतापासूनच मोर्चे बांधणी केली आहे. मुळची शिवसेनेची जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली. त्यामुळे पुढच्या वेळी परभणीवर महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचा दावा कमजोर झाला आहे. अशा वेळी ही जागा जर भाजपच्या पारड्यात पडली तर लोणीकरांचे लोकसभा लढण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकते.