स्मृती इराणी यांनी अखेर रिकामा केला सरकारी बंगला, नवीन घर कुठे मिळाले?

स्मृती इराणी यांना बंगला रिकामा करणे गरजेचे होते. गुरूवारी त्यांनी हा बंगला सोडला. गेल्या दहा वर्षापासून स्मृती इराणी या दिल्लीतील 28 तुगलग रोड वरील क्रीसेंट बंगल्यात रहात होत्या.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर दिल्लीतील आपला सरकारी बंगला खाली केला आहे. अमेठी लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता. शिवाय त्यांना नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळाले नाही. त्यामुळे नियमानुसार स्मृती इराणी यांना बंगला रिकामा करणे गरजेचे होते. गुरूवारी त्यांनी हा बंगला सोडला. गेल्या दहा वर्षापासून स्मृती इराणी या दिल्लीतील 28 तुगलग रोड वरील क्रीसेंट बंगल्यात रहात होत्या. नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर सर्व माजी केंद्रीय मंत्र्यांना त्यांचा बंगला रिकामा करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नियमानुसार जो खासदार निवडणूक हरतो त्याला सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. तोच बंगलानंतर जो खासदार जिंकून आला आहे त्याला दिला जातो. या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 17 केंद्रीय मंत्र्यांना पराभव स्विकारावा लागला. त्या पैकी  आर.के सिंह, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडेय, स्मृति ईरानी, संजीव बालियान, राजीव चंद्रशेखर, कैलाश चौधरी, अजय मिश्रा टेनी, वी मुरलीधरन, निशित प्रामाणिक, सुभाष सरकार, साध्वी निरंजन ज्योति, रावसाहेब दानवे, कौशल किशोर, भानुप्रताप वर्मा, कपिल पाटिल, भगवंत खुबा, भारती पवार यांना बंगला खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी या अमेठी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्या होत्या. काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा एक लाखा पेक्षा जास्त मतांना पराभव केला. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. आता त्या पराभवाची परतफेड काँग्रेसने केली आहे. 

Advertisement