अमोल गावंडे
बुलढाणा शहरात सध्या संजय गायकवाड यांची कार फार चर्चेत आहे. तब्बल दोन कोटींची ही कार म्हणजे अगदी राजेशाही थाट म्हणावा लागेल. आता एखादा आमदार दोन कोटीची कार घेतो आणि वाद होणार नाही हे अशक्यच म्हणावं लागेल. पण हा वाद विरोधकांनी नाही तर महायुतीतल्याच सहकाऱ्यांनी उकरून काढला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी ही डिफेंडर कार कंत्राटदाराकडून कमिशनच्या रुपात घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याच आमदारावर हा आरोप महायुतीच्याच घटक पक्षातील नेत्याने केला आहे. दरम्यान विजय शिंदेंच्या आरोपांवर संजय गायकवाडांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही कार आपली नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ही कार आपल्या नातेवाईकाची आहे. त्यामुळे आपल्यावर केला जाणारा आरोप हा चुकीचा आणि राजकीय आकसापोटी केला असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. डिफेंडर कार जरी संजय गायकवाड फिरवत असले तरीही या गाडीचा मालक कुणी दुसराच निघाला आहे.
निलेश ढवळे यांच्या नावावर ही गाडी खरेदी करण्यात आली आहे. ही गाडी कमिशन म्हणून संजय गायकवाड यांना दिलेली नाही, असं स्पष्टीकरण ही निलेश ढवळेंनी दिलं आहे निलेश ढवळे हे ठेकेदार आहेत. संजूभाऊंना कमिशन देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना मी गाडी भेट म्हणून दिलेली नाही असं निलेश ढवळे यांनी स्पष्ट केलं आहे. निलेश ढवळेंनी संजय गायकवाडांना कमिशन दिल्याचं नाकारलं आहे. मात्र विरोधक हे मान्य करायला तयार नाहीत.
नक्की वाचा - Pune News: शनिवार वाड्यात नमाज पठण! ट्वीटमुळे ट्वीस्ट, त्या व्हिडीओ मागचे सत्य काय?
याच ठोस कारण म्हणजे गाडीचा नंबर MH 56 A 3132 हे कारण आहे. संजय गायकवाड यांच्या सगळ्या गाड्यांवर 3132 याच नंबरची प्लेट दिसते. त्यामुळे कंत्राटदार निलेश ढवळे आणि स्वत: संजय गायकवाड यांनी नाकारलं तरीही ही गाडी कमिशन म्हणूनच दिल्याची चर्चा आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ही केला आहे. नेत्यांच्या गाड्या या दुसऱ्याच माणसांच्या नावाने रजिस्टर केलेल्या असतात असा दानवेंचा दावा आहे. याच दाव्यामुळे डिफेंडर गाडी नेमकी कुणाची यावरून संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ज्या डिफेंजर गाडीवरून वाद पेटलाय ते निलेश ढवळे नेमके कोण आहेत पाहुयात. निलेश ढवळे हे संतोष गायकवाड यांचे नातेवाईक आहेत. बुलढाण्यातील बड्या कंत्राटदारांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. शहरातील 70 टक्के कामांची कंत्राट ही निलेश ढवळेंच्या कंपनीकडेच आहेत. सध्या शहरातील 26 महापुरुषांचे पुतळे आणि बागांचं सौंदर्यीकरण,बुलढाणा कोर्टाच्या इमारतीचं नुतनीकरणाचं 32 कोटी रुपयांचं कंत्राट आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचं कंत्राटदेखील निलेश ढवळेंच्या कंपनीकडे आहे. निलेश ढवळे आणि संजय गायकवाड यांच्या याच संबधामुळे डिफेंडर गाडी वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभमीवर भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा रंगला आहे. युती करायची नाही यावरून दोन्ही बाजुचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहे. अशातच भाजपने संजय गायकवाडांचा हा कारनामा उकरून काढलाय. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र होणार हे निश्चित मानलं जात आहे.