पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंत नगर निगडे येथे राजगड सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या खेळत्या भांडवलासाठी 402 कोटी 90 लाख रुपये मार्जिन मनी कर्जाच्या प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राजगड सहकारी साखर कारखान्याने खेळत्या भांडवलासाठी सादर केलेल्या 499 कोटी 15 लाख रुपयाच्या मार्जिन मनी कर्ज मागणीतील 402 कोटी 90 लाख रुपयांच्या कर्जास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रस्तावामध्ये साखर प्रकल्प आधुनिकीकरण व विस्तारिकरण, आसवणी प्रकल्प उभारणी, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो सी बी जी प्रकल्प उभारणीसाठी 327 कोटी 25 लाख रुपये, विविध बँकांच्या कर्ज परतफेडीकरीता 67 कोटी 23 लाख रुपये, यंत्र सामुग्री दुरुस्ती आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी 8 कोटी 42 लाख रुपयांचा समावेश आहे. मार्जिन मनी लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी राजगड साखर कारखान्याने केंद्र सरकारकडून प्रकल्प विस्तारी करणासाठी आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी.
नक्की वाचा - Pune News: पुण्याच्या 'या' डॉक्टरांचे चाहते झाले आनंद महिंद्रा, कारण ही आहे खास
तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून पुर्व परवानगी घ्यावी. त्याच बरोबर 25 जून 2025 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे, या अटींवर कारखान्या प्रस्तावावर मान्यता देण्यात आली आहे. त्याच बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास 39 कोटी 88 लाख रुपयांचे मुदत कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेण्यास मान्यता देण्यात आली. या कर्जास कारखान्याचे संचालक मंडळास वैयक्तिक आणि सामूहिक रित्या जबाबदार असेल, कर्ज वितरणापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी अशा अटीसह शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली.