संभाजी राजे, मनोज जरांगे अन् तिसरी आघाडी, पडद्यामागे काय घडतयं?

आता छत्रपती संभाजी राजे यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पंढरपूर:

एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीकडून सत्ता घेचून घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वंचित, मनसे यांनी आपली वेगळी चुल मांडली आहे. अशात आता छत्रपती संभाजी राजे यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युती आणि आघाडीला राज्यात पर्याय मिळेल अशी रणनिती संभाजी राजेंनी आखली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उघडण्याचे प्रयत्न स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे पाटील यांनी यावे यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझे उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला कुठलीच अडचण नाही असे ते म्हणाले. शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणासाठीच आम्ही दोघे लढत आहोत. त्यामुळे त्यांना नेहमी सहकार्य आहे. मनोज जरांगे यांच्याशी लवकरच राजकीय चर्चा देखील होईल. असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण

 आगामी निवडणुकीच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी आपण निश्चितच राजकीय चर्चा करू. त्यातून तिसरी आघाडी उघडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे संभाजी राजे म्हणाले. राज्यातील आगामी निवडणुकीच्या तोंडावर एका नव्या पर्यायाची सुरुवात करत असल्याचे संकेतही त्यांनी या माध्यमातून दिले आहेत. समविचारी संघटनांनाही बरोबर घेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाच्यावतीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले जातील. याबाबत लवकरच बैठक होईल. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी ही नाकारता येत नाही असे ते म्हणाले. पंढरपूरचे अभिजीत पाटील हे लोकसभेला दुसरीकडे गेले होते. त्यांना आपण स्वराज्य पक्षाची ऑफर दिली आहे. आता त्यांनी ठरवायचे आहे.असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते.