Teacher Protest: मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. टप्पा अनुदान अजूनही न मिळाल्याने हे सर्व शिक्षक आंदोलन करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे शिक्षक आंदोलनावर बसले आहेत. त्यावरून आज (बुधवार, 9 जुलै) विधानपरिषदेत गदारोळ झाला. मात्र या सगळ्याचं खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर फोडलं आहे. या आंदोलनासाठी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागण्यासाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला पोलिसांनी आंदोलन स्थळाचा माईक आणि लाईट बंद केल्याचे आरोप केले गेले.
महाविकास आघाडतील नेत्यांनी या आंदोलक शिक्षकांची भेट घेतली. त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत विचारला. या शिक्षकांना चर्चेसाठी बोलवा अशी मागणी परब यांनी केली.
( नक्की वाचा: Marathi Language Row: मराठी भाषेसाठीच्या लढ्याला यश, केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला मोठा निर्णय )
या सगळ्याला उत्तर देत मुख्यमंत्री यांनी थेट विरोधकांना खडसावलं. एक बोट आमच्याकडे असेल तर चार बोटं तुमच्याकडे आहेत, महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील टप्पा अनुदान शिक्षकांना मिळालं नव्हतं आणि हा जीआर देखील तुमच्या सरकारमध्ये काढला गेला होता. मात्र शिक्षकांना एक फुटी कवडी देखील तुमच्या काळात मिळालं नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आमचं सरकार आल्यावर आम्ही शिक्षकांना अनुदान देण्यास सुरुवात केलं होय यावेळी जरा पैसे द्यायला उशीर झाला पण आम्ही निश्चित चर्चा करून त्यांना त्यांचे पैसे देऊ असं आश्वासन देखील शिक्षकांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरामध्ये दिलं.
उद्धव ठाकरेंचा सवाल
महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं सरकार आता नाही तुमचं सरकार आहे मग तुम्ही का करून दाखवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हास्य जत्रा सुरू आहे आणि हास्य जत्रा संपल्यावर शिक्षकांना मदत करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.