Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरात महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पक्षांतराच्या 'फोडाफोडी'च्या राजकारणामुळे नाराजी नाट्य शिगेला पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर, आता शिवसेनेने (शिंदे गट) थेट एक बॅनर लावून भाजपला डिवचले आहे, ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांना हा थेट इशारा जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
ठाकूर्ली उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या या बॅनरचा आशय 'फोडाफोडीच्या राजकारणाला छेद, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल' असा आहे. या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना 'विकास' हेच आपले उत्तर असल्याचे दाखवून दिले आहे.
आमदारांची अप्रत्यक्ष टीका
या बॅनरमुळे निर्माण झालेल्या चर्चेनंतर, शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मोरे म्हणाले, "आम्ही कोणावर टीका करत नाही, किंवा गलिच्छ राजकारण करत नाही. शिवसेना विकासाच्या कामातून उत्तर देते." आमदार मोरे यांच्या बोलण्याचा रोख स्पष्टपणे भाजपच्या नेतृत्वाकडे होता. फोडाफोडीच्या राजकारणावर थेट बोट न ठेवता, 'विकास' हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
( नक्की वाचा : Kalyan News : 'KDMC अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये घुसून मारणार!' खासदाराचा थेट इशारा, पाहा Video )
रखडलेल्या ठाकूर्ली पुलासाठी 36 कोटी रुपये!
शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा करण्यामागे ठाकूर्ली उड्डाणपुलाच्या कामाला मिळालेली गती हे प्रमुख कारण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या पुलाच्या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून एमएमआरडीए (MMRDA) कडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
या पाठपुराव्याला यश आले असून, नगरविकास खात्याकडून या कामासाठी तब्बल 36 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. एमएमआरडीएने (MMRDA) या कामाची निविदा (Tender) देखील काढली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
हा निधी मंजूर झाल्याच्या आनंदात आमदार राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, पदाधिकारी विवेक खामकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकूर्ली पुलाजवळ जल्लोष केला. यावेळी मोरे यांनी 'आम्ही विकासाचे राजकारण करतो, गलिच्छ राजकारण करीत नाही' असे स्पष्ट केले.