संजय तिवारी, प्रतिनिधी
Who is Fatima Sheikh? : देशात महिला शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंसोबत फातिमा शेख हे नाव देखील गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घेतलं जातं. महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात स्थापन केलेल्या शाळेत फातिमा शेख या शिक्षिका होत्या. देशातील पहिल्या मुस्लीम शिक्षिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पण, फातिमा शेख हे बनावट पात्र होतं. ते इतिहासात घुसवण्यात आलं अशी कबुली केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी दिली आहे.
फातिमा शेख यांची जयंती (9 जानेवारी) साजरी होत असतानाच मंडल यांनी ही कबुलीजवाब दिला आहे. त्यामुळे या विषयावरील चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. फातिमा शेख ही कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती नाही. ते पात्र मी तयार केलं होतं, असा दावा मंडल यांनी त्यांच्या कबुली जबाबामध्ये केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मंडल?
लेखक आणि विचारवंत अशी दिलीप मंडल यांची ओळख आहे. मंडल यांनी सोशल मीडिया हँडल X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये फातिमा शेख यांच्याबद्दलचा कबुली जबाव दिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलंय, 'मला माफ करा. वास्तविक फातिमा शेख असं कुणीच नाही. त्या ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही माझी निर्मिती आहे. हा माझा अपराध आहे. मी एका विशिष्ट काळात हे पात्र उभं केलं.
या विषयात कुणाला नावं ठेवायची असतील तर मला नावं ठेवा. आंबेडकरवादी याबाबत माझ्यावर नाराज आहेत. माननीय अनिता भारती ते डॉक्टर अरविंद कुमारपर्यंत अनेकांनी या विषयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
मी हे का केलं हे मला विचारु नका. मला एक मूर्ती तयार करायची होती ती मी तयार केली. हजारो जण त्याला साक्ष आहेत. बहुतेकांनी ते नाव पहिल्यांदा माझ्याकडूनच ऐकलं आहे. हे कसं करायचं, प्रतिमा निर्मिती कशी करायची हे मला माहिती आहे. मी त्या कामात तज्ज्ञ आहे. ते माझ्यासाठी काही अवघड नाही. माझं काम आहे.
( नक्की वाचा : राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )
भारतामध्ये फातिमा शेख यांची पहिली जयंती माझ्या पुढाकारानं साजरी झाली. मी पहिल्यांदा हे नाव घेतलं. एक काल्पनिक चित्र बनवलं. कारण, कोणताही जुना फोटो नव्हता. मी कथा रचल्या, या पद्धतीनं फातिमा शेख तयार झाल्या. त्याचा प्रसार होत गेला.
ज्यांना हे समीकरण हवं होतं, त्यांनी आगीसारखी ही गोष्ट पसरवली. सावित्रीबाई फुलेंसोबत फातिमा शेख हे काल्पनिक चरित्र जोडल्यानंतर कुणाचा फायदा आहे, हे तुम्ही समजू शकता. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सर्व लेखन प्रसिद्ध आहे. त्यामध्ये कुठंही हे नाव नाही. बाबासाहेबांनी देखील हे नाव घेतलं नाही. वास्तविक ज्योतिबा फुले हे महात्मा फुले यांचे गुरु होते.
मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील कोणत्याही महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रकारानं फातिमा शेख यांचं नाव घेतलं नाही. मुसलमानांनाही फातिमा शेख कुणी आहे हे माहिती नव्हतं. 2006 पूर्वी या नावाचा कोणताही उल्लेख दाखवा, मी पैज लावतो.
( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
कोणत्याही मुस्लीम विचारवंतानं 15 वर्षांपूर्वी या नावाचा उल्लेखही केला नव्हता. ब्रिटीशांच्या कागदपत्रांमध्ये फुले दाम्पत्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख आहे. पण, फातिमा शेख असं कोणंतही नाव नाही. कुठंही नाही साहेब. कुठंच मिळणार नाही.
पुरावे म्हणून माझे जुने ट्विट, फेसबुक पोस्ट, लेख किंवा व्हिडिओ काढू नका. फातिमा शेख यांचं नाव मी सर्वात जास्त वेळा घेतलं होतं. मी हे मान्य करतो. पण त्या अस्तित्वातच नव्हत्या.' अशी पोस्ट मंडल यांनी केली आहे.
शालेय पुस्तकातील उल्लेख रद्द करा
मंडल यांच्या पोस्टनंतर पुन्हा एकदा हा वाद ताजा झालाय. शालेय पुस्तकातून फातिमा शेख यांचा जो अंतर्भाव केलेला आहे तो राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना केली आहे.
'क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे महत्व कमी करण्याचा पद्धतशीर डाव'
गूगलनं 2022 साली फातिमा शेख यांच्यावर डूडल केलं होतं. त्यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक आणि फुले विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी देखील याबाबत ट्विट केलं होतं. त्यामध्ये फातिमा शेख यांचा त्रोटक उल्लेख सापडतो. या कपोलकल्पित काहाण्य़ा रचण्यात आल्या आहेत, असं लिहिले होते.
नरके यांच्या ट्विटवर सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी यांनी त्यावर फातिमा शेख यांची जन्मतारीख आम्ही ठेवली असा उल्लेख आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी असते. त्यानंतर सहा दिवसांनी फातिमा यांची जन्मतारीख ठेवण्याचा उद्देश काय? हे सावित्रिबाई फुले याचं महत्त्व कमी करण्याचं काम आहे, असा दावा विवेक विचार मंचचे सागर शिंदे यांनी केला आहे.