बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद वाजू लागले आहेत. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधकांची इंडी आघाडी (INDIA) यांच्यात यंदा चुरशीची लढत आहे. सत्तारुढ आघाडी मुख्यमंंत्री नितिशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहे. ते पुन्हा मुख्यमंंत्री होणार की नाही? ही चर्चा सध्या सुरु आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांना थेट उपपंतप्रधान करावं अशी मागणी केलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे मागणी?
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नितिशकुमार यांना उपपंतप्रधान करावं अशी मागणी केली आहे. चौबे म्हणाले की, 'नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार ही जोडी राम लक्ष्मणासारखी आहे. नितीशकुमारांसाठी मुख्यमंत्रिपद आता मोठं राहिलेलं नाही. 20 वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणे काही छोटी गोष्ट नाही. मला असं वाटतंय की आता बिहारची इच्छा आहे, आमचे नितिश भाई NDA चे संयोजक व्हावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीममध्ये उपपंतप्रधान झाले तर मोठी कृपा होईल.'
( नक्की वाचा : ऊडी बाबा! TMC खासदारांत मोठा राडा, व्हॉटसअप चॅट लीक झाले, भाजपाने जगजाहीर केले )
अश्विनी कुमार चौबे हे नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. ते 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. ते दोन वेळा बक्सर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तसंच भागलपूरचे अनेक काळ आमदार होते. चौबे जयप्रकार नारायण यांच्या आंदोलनापासून बिहारच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जवळचं मानलं जात.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौबे यांनी ही मागणी केलीय. आता या मागणीला भाजपा किंवा सहकारी मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडमधून किती बळ मिळतं हे लवकरच स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर कधीही उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधानांची निवड केलेली नाही. त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे. पण, या प्रकारची मागणी करुन नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणातून केंद्रात पाठवणे ही यामागील भाजपाची योजना आहे का? ही चर्चा आता सुरु झाली आहे.