'....तर फोटो आणि व्हिडिओ जाहीर करा,' खडसेंच्या दाव्याला महाजनांनी दिलं उत्तर

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपाला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
धुळे:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. आपला भाजपा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांमुळे रखडला असल्याचा आरोप खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी खडसे यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. नड्डा यांच्या हस्ते आपला पक्षप्रवेश झाला होता, असा दावा खडसे यांनी केला होता.  जेपी नड्डा यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन हे दोन्हीही मोठे असल्याची खोचक टीकाही खडसेंनी केली होती. या सर्व टीकेला महाजन यांनी उत्तर दिलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या 54  गावांना शेतीसाठी थेट पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या 'बंदिस्त पाईप वितरण प्रणाली' योजनेचे भूमीपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं आहे. 

'एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाल्याचं ते सांगत आहेत.अमित शहा यांनी माझ्या गळ्यात मफलर टाकलं असंही ते सगळ्यांना सांगतात. दुसरिकडं महाविकास आघाडीला निवडून आणू असंही सांगत आहेत. त्यांचं काय चालंलय हे मला कळत नाही. 

( नक्की वाचा : 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं )
 

एकनाथ खडसे यांना आपल्याच घरामध्ये सगळे पक्ष आणि सगळी पदे हवे आहेत. चुकून जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर त्यांच्या मुलीला त्यांना मंत्री करायचे आहे. त्यामुळे अशी दूटप्पी भूमिका आमच्याकडे चालणार नाही. त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला असेल तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ जाहीर करावे,' असं आव्हान महाजन यांनी यावेळी दिलं. 

खडसेंची राजकीय कारकिर्द

महाराष्ट्र भाजपातील जुने नेते असलेले एकनाथ खडसे फडणवीस सरकारच्या काळात नाराज होते. त्यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन होते असा खडसे यांचा आरोप होता. त्यामुळे पक्षात राहून त्यांनी वारंवार फडणवीस आणि महाजन यांना लक्ष्य केलं होतं. शेवटी त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

( नक्की वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर )
 

खडसे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवरही पाठवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. आपला पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता. पण त्यांचा पक्षप्रवेश काही झाला नाही. त्यामुळे खडसे आता पुन्हा नाराज झाले आहेत.