गुरूवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 21 जुलै रोजी, जेव्हा हे अधिवेशन सुरू झाले होते, तेव्हा एका मोठ्या राजकीय घटनेने देशात खळबळ माजली होती. तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी यामागे आपले खराब आरोग्य हे कारण सांगितले होते. मात्र, त्यानंतर एनडीटीव्हीने या राजीनाम्यामागील इतर काही संभाव्य कारणे सविस्तरपणे सांगितली. गेल्या एक महिन्यापासून राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात आहे: धनखड कुठे आहेत? हाच प्रश्न काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही विचारला. सध्या उपराष्ट्रपती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे आणि एनडीए (NDA) व इंडिया (INDIA) या दोन्ही आघाड्यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. अशा वेळी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
धनखड कुठे आहेत?
गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यानंतर धनखड कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. कोणत्याही माध्यमात त्यांचे कोणतेही वक्तव्य आले नाही. अनेक खासदारांनी सांगितले की त्यांनी धनखड यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खासगी सचिवाकडे वेळ ही मागितली. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याच प्रश्नाचे उत्तर एका मंत्र्याला विचारले असता, त्यांनी सांगितले की धनखड सध्या उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानीच आहेत.
टाइप आठ बंगला मंजूर
माजी मंत्री किंवा खासदारांसाठी सरकारी निवासस्थानांबाबतचे नियम स्पष्ट आहेत. त्यांना पद सोडल्यानंतर एका महिन्याच्या आत सरकारी घर रिकामे करावे लागते. काही विशेष परिस्थितीत ही मुदत वाढवली जाऊ शकते. मात्र, माजी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना पद सोडल्यानंतर केंद्र सरकारचे शहरी गृहनिर्माण आणि विकास मंत्रालय 'टाइप आठ' बंगला मंजूर करते. धनखड यांचे प्रकरण थोडे वेगळे आहे. कारण यापूर्वी कोणत्याही उपराष्ट्रपतीने आपला कार्यकाळ संपण्याआधी अशा प्रकारे राजीनामा दिलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अद्याप सरकारी घरासाठी शहरी विकास मंत्रालयाशी संपर्क साधलेला नाही. पण शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'डायरेक्टर ऑफ इस्टेट'ने माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्गावर 34 क्रमांकाचा 'टाइप 8' बंगला रिकामा करून ठेवला आहे. जर जगदीप धनखड यांना हा बंगला आवडला नाही, तर मंत्रालय त्यांना दुसरा पर्याय देऊ शकते. माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांना लुटियन झोनमध्ये 'टाइप 8' बंगला किंवा त्यांच्या मूळ गावी दोन एकर जमीन दिली जाते. मात्र, धनखड यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने सध्या परिस्थिती स्पष्ट नाही.