दहीहंडीला साहसी खेळांचा दर्जा मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रो गोविंदा स्पर्धेची घोषणा केली होती. ही स्पर्धा यंदा वादात सापडली आहे. याचं कारण म्हणजे मुंबईतील दिग्गज 'जय जवान' पथकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जय जवान पथकानं स्पर्धेसाठी वेळेत एन्ट्री न भरल्यानं जय जवानला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप होत आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील दिग्गज दहीहंडी क्लब अशी 'जय जवान' पथकाची ओळख आहे. त्यांच्या नावावर 9 थर लावण्याचा करण्याचा रेकॉर्ड आहे. मागच्या वर्षी झालेल्या प्रो गोविंदा स्पर्धेचंही त्यांनी विजेतेपद पटकावले होते. मात्र आता या जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदा स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान वरळीतल्या डोममध्ये प्रो गोविंदा ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 10 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. जय जवान गोविंदा पथकाने भाग घेण्यासाठी 12 वाजून 4 मिनिटांनी नोंदणी केली. नोंदणीसाठी चार मिनिटांनी उशीर केल्यानं जय जवानला स्पर्धेत प्रवेश देण्यात आला नाही. मात्र 12 वाजून 4 मिनिटांनी नोंदणी करणाऱ्या इतर दोन संघांना स्पर्धेत प्रवेश दिल्याचा आरोप जय जवान संघानं केला आहे.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती )
राजकारणाचा आरोप
निकषांचं आणि वेळेचं कारण देण्यात आलं असलं तरी जय जवानला या स्पर्धेबाहेर ठेवण्याचं खरं कारण वेगळंच असल्याची चर्चा आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधुंचा एकत्रित मेळावा मुंबईत झाला. त्यावेळी जय जवान गोविंदा पथकानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आगमनावेळी दहीहंडीचे थर रचून सलामी दिली होती.
जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत. प्रो गोविंदाचे आयोजन मात्र शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक करतात
ठाकरेंना सलामी दिल्याचा शिंदे गटाला राग आल्यानं जय जवान प्रो गोविंदामधून बाहेर गेल्याची चर्चा आहे.
गोविंदाला राजकारणात आणू नका, गोविंदांना दहीहंडीचा आनंद लुटू द्या, असं एकेकाळी गोविंदा राहिलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी आहे. तर प्रो गोविंदा पथकाचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
यंदाच्या दहीहंडीत दहा थर लावण्याचा जय जवानचा इरादा आहे. मात्र यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत हे पथक नसेल. गोविंदा असा राजकारणात अडकणार असेल तर हे कुठल्या थराचं राजकारण याचा विचार करावा लागेल.